
नाशिक येथे माता पित्यांसमवेत सत्कार स्विकारताना रसिका.
सिन्नर.( वसंत गोसावी सोनांबे बातमीदार ):सिन्नर तालुक्यातील हरसुले या ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू म्हणून नाव कमावणाऱ्या रसिका प्रदीप शिंदे हिचा नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने श्रीमती पुष्पाताई रौंदळ करंडक स्मृती सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनिल ढिकले, सरचिटणीस नितीन ठाकरे, संचालक मंडळ व सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांच्या हस्ते रसिकाला एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

.सिन्नर तालुक्यातील हरसुलेसारख्या ग्रामीण वातावरणात वाढून, आई-वडील शिक्षक असलेल्या घरातून रसिकाने आपला खेळ आणि अभ्यासाचा समतोल साधत क्रिकेटमध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. तिची आई श्रीमती मंगला शिंदे अभिनव बालविकास मंदिरात शिक्षिका असून, वडील प्रदीप शिंदे हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. लहानपणापासून पालकांचे मार्गदर्शन, शिस्तबद्ध सराव व अभ्यासाबरोबर वाचन, वक्तृत्वाची आवड यामुळे तिचे व्यक्तिमत्त्व सर्वांगीण घडले.रसिकाने इयत्ता दहावीमध्ये शंभर टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले. तिने नर्सरीपासून ते पोस्ट-ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत घेतले आहे.महाराष्ट्र अंडर-14, अंडर-16, अंडर-19 तसेच वरिष्ठ महिला संघात तीने स्थान पटकावले आहे.महाराष्ट्र अंडर-19 संघाची कॅप्टन म्हणून यशस्वी नेतृत्व केले आहे.शालेय, विद्यापीठीय व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने चमकदार कामगिरी करत तिने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला द्वितीय स्थान मिळवून देण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. थायलंडमध्ये क्रिकेटच्या प्रचार-प्रसारासाठी तिने सहभाग घेतला होता.महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.के.टी.एच.एम. महाविद्यालयाची सलग दोन वर्षे सर्वोत्कृष्ट खेळाडू गौरव प्राप्त झाला आहे.रसिका ही खेळाडू असली तरी वक्तृत्व कलेतही पारंगत आहे. मराठा क्रांती मोर्चा (नाशिक व मुंबई) मध्ये तिने केलेली भाषणे लक्षवेधी ठरली होती.क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती मीनाक्षी गवळी, क्रीडाशिक्षक हेमंत पाटील, तसेच आई श्रीमती मंगला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने आपली कारकीर्द घडवली आहे.

ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या रसिका शिंदे ही भारताची भावी महिला क्रिकेटपटू म्हणून ओळखली जात आहे. हरसुलेकरांसह संपूर्ण सिन्नर तालुक्यातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
*ग्रामस्थ प्रतिक्रिया*
“आई-वडीलांचे संस्कार, शिस्तबद्ध मेहनत आणि संस्थेचा पाठिंबा यामुळे रसिकाने ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचे स्वप्न साकार केले,” असे ग्रामस्थ म्हणत आहेत.
