
अजित निकत,उप आयुक्त,मनपा नाशिक यांना विसर्जित मूर्ती संकलन मोहीम काटेकोरपणे अंमलबजावणी करणे कामी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने निवेदन देताना महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे
नाशिक (प्रतिनिधी )सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सहा फुटापेक्षा जास्त उंचीच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन जर पर्याय नाही म्हणून नैसर्गिक जलस्त्रोतात करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी या मूर्ती स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपरिषद , ग्रामपंचायत) यांनी योग्य खबरदारी घेऊन बाहेर हलवाव्यात, अशा सूचना पर्यावरण विभागाने दिलेल्या आहेत. मा. उच्च न्यायालयाने नऊ जून २०२५ रोजी केवळ पीओपी च्या मूर्ती बनवण्यावरील बंदी उठवली होती. परंतु राज्य शासनाला पीओपी मूर्ती विसर्जनाबाबत धोरण तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे एक ऑगस्टला पर्यावरण विभागाने धोरण तयार करून त्यात मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. विसर्जनाच्या वेळी त्यांचे काटेकोरपणे पालन व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने निवेदनाद्वारे मा. आयुक्त मनपा नाशिक तसेच मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांना करण्यात आले आहे. निवेदनात पुढे नमूद आहे की पर्यावरण विभागाच्या अठरा सूचनांप्रमाणे पीओपी मूर्तीमागे लाल ऑइल पेंटने गोल चिन्ह करावे. मूर्ती विक्रीची नोंदवही ठेवणे बंधनकारक आहे. पीओपी मूर्ती विसर्जना बाबत माहिती पत्रिका स्थानिक स्वराज्य संस्थांनी मूर्तिकारांना पुरवाव्यात. त्या मूर्ती नेणाऱ्यांना द्यायच्या आहेत .सार्वजनिक मंडळांकडून मूर्तींबाबत आवश्यक माहिती संकलित करावी. मंडळांना लहान मूर्ती प्रतिष्ठापित करण्याबाबत प्रोत्साहन द्यावे. मंडळांच्या सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित कराव्यात. या सूचनांचा प्रसारमाध्यमातून प्रचार, प्रसार गावपातळीपर्यंत करावा. जनजागृती करावी. योग्य ठिकाणी पुरेसे कृत्रिम तलाव(हौद) असतील आणि त्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ असेल, याचे नियोजन करावे अनेक भाविक दीड दिवसात तीन दिवसांत,पाच दिवसांत विसर्जन करतात. त्यावेळी त्या त्या ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था नसल्याने अनेक मूर्ती नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जित केल्या जातात. असे होणार नाही, याची दक्षता अगोदरच घ्यावी. असेही महाराष्ट्र अंनिसने सुचवले आहे. कोणत्याही कारणास्तव कोणत्याही जलस्रोतांचे प्रदूषण होणार नाही, याची भाविकांनी सुद्धा काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, जिल्हा प्रधान सचिव अरूण घोडेराव, विविध उपक्रम जिल्हा सचिव विजय बागुल यांच्या सह्या आहेत.
