
नाशिक: (प्रतिनिधी )- सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महिला ह्या पुरुषांपेक्षा काकणभर सरसच आहेत. आजच्या काळात सुदृढ आणि संपन्न समाज निर्मितीमध्ये महिलांचे योगदान अतिशय श्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या वतीने मविप्रच्या गंगापूर रोडवरील आयएमआरटी ऑडीटोरियममध्ये महिलांसाठी आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. मंचावर ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले, सुहास टिपरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर, गिरजा मंचच्या जिल्हाध्यक्ष शितल कुयटे, राज्य सरचिटणीस भारती निकम, भाग्यश्री चौधरी उपस्थित होते. ॲड.ठाकरे पुढे म्हणाले की, कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नव्या युगाचे स्वागत करण्यासाठी आजची महिला सदैव सज्ज आहे. स्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने आता समाजात रुजू लागली आहे. ही नव्या युगाची नांदी आहे, असेही ते म्हणाले. राज्यभरातील सुमारे शंभरहून अधिक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, प्राचार्य डॉ.प्रशांत सूर्यवंशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक उगलमुगले आणि सविता पोतदार यांनी परीक्षण केले. श्रुती बोरस्ते (प्रथम), अश्विनी सांगळे (द्वितीय), श्रावणी बच्छाव (तृतीय), शरयू सोनवणे-भागवत आणि प्रियंका बुब (उत्तेजनार्थ) यांना स्व.विमलाबाई टिपरे यांच्या स्मरणार्थ सुहास टिपरे यांच्या वतीने रोख पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. भाग्यश्री चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सविता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. कांचनमाला हुजरे यांनी आभार मानले. गिरजा महिला मंचच्या बागलाण तालुकाध्यक्षा स्वाती सोनवणे, निफाड तालुकाध्यक्षा कल्पना माने, येवला तालुकाध्यक्षा संगीता महाजन, चांदवड तालुका प्रतिनिधी वंदना गांगुर्डे, निफाड तालुका कार्याध्यक्ष वैशाली शिंदे, विद्या वाघमारे, संगीता महाजन आदी गिरजा महिला मंचच्या पदाधिकारी आणि सदस्या उपस्थित होत्या.
