
नाशिक:- ( प्रतिनिधी ) साहित्याच्या अंगणातील सर्वात सुंदर फुल कोणते असेल तर ते असते कविता ! ती चांगली किंवा वाईट नसते. जसं बागेतील प्रत्येक फुल हे पाहणाऱ्याला सुंदरच दिसतं तशी कविता असते. आपण फक्त तिचा आस्वाद घ्यायचा. कवितेला बक्षीस मिळालं म्हणजे कविता चांगली असं होत नाही. कारण बक्षीस हे काही कोणत्याही साहित्यकृतीचं मोजमाप नाही आणि कविता तर नाहीच नाही. कारण ‘कविता ही माणसं जोडणारी चळवळ आहे’ असंच मला कायम वाटतं असे विचार ज्येष्ठ साहित्यिक, कवी विवेक उगलमुगले यांनी व्यक्त केले. ते भगवान परशुराम संकुल,राजमाता जिजाऊ क्रीडा नगरी,छात्रवीर छत्रपती संभाजी चौक,शिवनगर चौफुली,तारवाला नगर,दिंडोरी रोड ,पंचवटी नाशिक या ठिकाणी पंचवटी ललित कला मंडळाने आयोजित केलेल्या खुल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. उगलमुगले पुढे म्हणाले की, कवींनी खूप वाचले पाहिजे. जे वाचले त्यावर चिंतन केले पाहिजे. एखाद्या कवीने त्याचा अनुभव त्याच्या कवितेत कसा मांडला आहे त्यावरून आपला अनुभव आपण आपल्या कवितेत कसा गुंफू यासाठी प्रयत्न करायला हवा. शिवाय कविता सादरीकरण हे ही एक महत्त्वाचे अंग आहे त्याचाही सराव करायला हवा. बऱ्याचदा कविता आशयसंपन्न असूनही सादरीकरणा अभावी ती वाचकांपर्यंत नीट पोहचत नाही. कविता छोटी किंवा मोठी नसते तर ती आशयाने किती समृद्ध आहे हे महत्त्वाचे. संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर, नाशिक कवी संस्थेचे कवी सुभाष सबणीस, साहित्यकणा फाउंडेशनचे सचिव विलास पंचभाई, पलकम चे अध्यक्ष अरुण इंगळे इत्यादी मान्यवर होते. जवळपास पंच्याहत्तर कवींनी या संमेलनात आपला सहभाग नोंदविला. त्याचे परीक्षण कवी विलास पंचभाई यांनी केले व त्यानुसार सर्वेश साबळे व निशांत गुरू यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक सोनाली चव्हाण आणि नितीन गढवे यांना तर तृतीय क्रमांकही भावेश जाधव आणि माधुरी अमृतकर यांना विभागून देण्यात आला. प्राची पवार या बालकवयित्रीला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. पं ल क मं चे सचिव प्राचार्य राजेश्वर शेळके यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पंकजकुमार गवळी यांनी प्रास्ताविक तर गोरख पालवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र उगले, चेतन बर्वे, प्रवीण जाधव, समाधान मुर्तडक, अनिल सूर्यवंशी,रोहित कानडे यांनी परिश्रम घेतले.
