
लोणारवाडी -(- वसंत गोसावी- सोनांबे बातमीदार) लोणारवाडी (ता. सिन्नर) येथे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधिक्षक रुपाली पगारे, परिविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी तेजश्री पवार, डुबेरे बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे व ब्राम्हणवाडे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी सुनिता अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली.या कार्यशाळेसाठी उपस्थित केंद्रप्रमुख व त्यांचे अधिनस्त केंद्र याप्रमाणे – विजय खैरनार (ठाणगाव, विंचुरदळवी), कृष्णकांत शिंदे (ब्राम्हणवाडे, दापूर), दत्तात्रय गवळी (सिन्नर), विजय निरगुडे (डुबेरे), मिनाक्षी सोनवणे (मुसळगाव), बाळासाहेब फड (किरतांगळी), शिवाजी बर्गे(शहा), तानाजी पवार (सोनांबे), नवनाथ आढाव (मह्रळ) आदी केंद्रप्रमुख उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी डॉ.बागुल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची निपुण महाराष्ट्र अभियान ॲपवर लोणारवाडी येथील विद्यार्थ्यांची पुनर्चाचणी प्रात्यक्षिक घेवून त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी शासन निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांच्या मूलभूत कौशल्यांची पुर्न पडताळणी वेळेवर पूर्ण करण्याचे महत्व अधोरेखित केले. तसेच शिक्षकांनी अध्यापन पद्धतीमध्ये नवकल्पना आणून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा, असे आवाहन केले.प्रधानमंत्री पोषण योजनेबाबत श्रीमती रुपाली पगारे यांनी आढावा घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार पुरविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी सूचना केल्या. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.सांगळे व श्रीमती अहिरे यांनीही निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी, केंद्रनिहाय प्रगती व भावी कार्ययोजना यावर मार्गदर्शन केले.दरम्यान, पुढील पाच दिवस सिन्नर तालुक्यातील सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षातील दुसरी ते आठवी विद्यार्थ्यांची निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पडताळणी सुरू झाली आहे. यासाठी केंद्रनिहाय विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहेत. विद्यार्थी पडताळणीसाठी मुद्देसूद निकष निश्चित करण्यात आले आहेत. या तपासणीतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा सर्वांगीण आढावा घेऊन आवश्यक ते सुधारात्मक उपाय तातडीने राबविण्यात येणार आहेत. कार्यशाळा अतिशय खेळीमेळीच्या व संवादात्मक वातावरणात पार पडली. सर्व केंद्रप्रमुखांनी सक्रिय सहभाग नोंदवून अनुभवांची देवाणघेवाण केली. निपुण महाराष्ट्र अभियानाच्या पुर्न पडताळणीसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरली असून, यामुळे तालुक्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेला नवीन दिशा मिळणार आहे. डुबेरेचे केंद्रप्रमुख विजय निरगुडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून सुत्रसंचलन केले. कार्यशाळेच्या यजमान शाळेचे मुख्याध्यापक दिपक पांगारकर, उपशिक्षक संदीप पाटील, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सौ. योगिता पोटे मॅडम आदींनी संयोजन करून कार्यशाळा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

- अशी होणार पडताळणी*
👉20 ऑगस्ट पासून निपूण महाराष्ट्र अभियान विद्यार्थी पडताळणीच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात.
👉शाळेतील दुसरी ते आठवी इयत्तेतील पटसंख्येच्या 15 टक्के किंवा कमाल 10 विद्यार्थी यातील जी संख्या अधिक असेल तितक्या विद्यार्थ्यांची प्रत्येक इयत्तेतून पडताळणी होणार.
👉पथकाकडून प्राप्त पडताळणीनुसार जागेवर ऑनलाईन ॲपद्वारे माहिती भरली जाणार.
या आहेत अडचणी :-
👎सिन्नर तालुक्यातील तीन शिक्षण विस्तार अधिकारी व नियमित सहा केंद्रप्रमुख यांचेच लॉगीन आय डी प्राप्त झाले असून प्रभारी केंद्रप्रमुख ॲपच्या प्रतिक्षेत आहेत.
👎निपुण महाराष्ट्र अभियान हे ऑनलाईन ॲप असल्याने प्रत्येक ठिकाणी रेंज असेलच असे नाही त्यामुळे प्रत्यक्ष कामकाजाला अधिक वेळ लागू शकतो.
👎विशेष गरजा असलेले व अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना पडताळणीसाठी जास्तीचा वेळ लागू शकतो.
