
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (ए.ए.) आशिर्वाद गट, उरण यांनी रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी आपला २५ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला. हा सोहळा सेंट मेरी स्कूल, राजपाल नाका, उरण येथे आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून ए.ए.चे सदस्य तसेच शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. संपूर्ण दिवस कृतज्ञता, स्नेहभाव आणि अनुभव, शक्ती व आशा वाटून घेण्याच्या वातावरणाने भरलेला होता. सदस्यांनी आपला पुनर्वसनाचा प्रवास मांडला, गटाच्या योगदानाबद्दल आभार मानले आणि अजूनही मद्यपानाच्या समस्येत अडकलेल्या लोकांपर्यंत ए.ए.चा संदेश पोहोचवण्याची वचनबद्धता व्यक्त केली.या कार्यक्रमामध्ये विशेष शेअरिंग सत्रे तसेच कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला. एकमेकांना मदत करण्याच्या ए.ए.च्या भावनेला अधोरेखित करत सदस्यांनी एकता, सेवा आणि संदेश वहन करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा दृढ केले.अल्कोहोलिक्स अॅनॉनिमसची स्थापना १९३५ साली झाली. ही एक जागतिक संस्था असून तिचे सदस्य एकमेकांना मदत करून संयम प्राप्त करतात व टिकवतात. ए.ए. कोणत्याही पंथ, संप्रदाय, राजकारण किंवा संस्थेशी संबंधित नाही. त्याचा एकमेव उद्देश म्हणजे मद्यपानातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या लोकांना मदत करणे हा आहे.आशिर्वाद गट उरण यांनी २५ व्या वर्धापनदिन समारंभ अविस्मरणीय बनवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व सदस्य व शुभेच्छुकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
