
सोनांबे बातमीदार : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे येथे आज गोपाळकाला निमित्त विद्यार्थ्यांनी ज्ञान, आनंद आणि परंपरा यांचा संगम अनुभवला. पारंपरिक दहीहंडीला आधुनिकतेची जोड देत सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषेच्या स्वरूपात शैक्षणिक दहीहंडी घेण्यात आली. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

आधुनिक शैक्षणिक दहीहंडी म्हणजेच आध्यात्मिक सण आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाची हसतखेळत सांगड आहे. एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. त्यानुसार शाळेने शतकोत्तर एकादश वर्षानिमित्त हा उपक्रम राबविला आहे.इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. आकर्षक सजविलेल्या दहीहंडीमधून क्रमांकानुसार प्रश्नरूपी चिठ्ठ्या काढून विद्यार्थ्यांना ‘ज्ञानाचा प्रसाद’ देण्यात आला. प्रश्नांची उत्तरे देत विद्यार्थ्यांनी गुण मिळवले आणि वर्गनिहाय गट करून स्पर्धा पार पडली. यामध्ये सातवीच्या विद्यार्थ्यांनी 66% गुण मिळवत प्रथम क्रमांक, पाचवीने 48% गुणांसह द्वितीय क्रमांक, तिसरीने 44% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.सहावीने 42% गुण घेऊन चौथा तर चौथीने 30% गुण घेऊन पाचवा क्रमांक मिळवला.

दहीहंडी सजावट कैलास पवार यांनी केली. प्रश्नमंजुषा निर्मिती व गुणदान स्वाती खताळे आणि सुनिता भिसे यांनी केले. तर संयोजनाची जबाबदारी सुनिता बर्वे, प्रतिभा बैरागी आणि अनिता दातीर यांनी निभावली. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना शाळेच्या वतीने बक्षिसे तसेच दहीहंडीचा प्रसाद देण्यात आला. बालगोपालांच्या सहभागामुळे शाळा प्रांगणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. गोपाळकाला हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत, सामूहिकतेचा आणि समतेचा संदेश देणारा सण आहे.गोपाळकाला या सणात शेतकरी, मजूर, शहरी, ग्रामीण, लहान–मोठे, श्रीमंत–गरीब, स्त्री–पुरुष सगळे मिळून धान्य, भाजी, फळे, दुध-दही, पोळी-भाकरी मिसळून एकत्र जेवतात..त्यातून सर्वांचा अन्नात, संसाधनांत आणि आनंदात समान हक्क आहे हा विचार प्रकट होतो.दहीहंडी फोडताना खालचा थर, मधला थर, वरचा थर या सर्वांची एकमेकांवरची नाती व समन्वय हे सामूहिकता, परस्पर विश्वास आणि सहकार्य शिकवतात. भारतीय संविधानातील प्रस्तावनेत समता, बंधुता व न्याय हे तत्वज्ञान सांगितले आहे.अनुच्छेद १४ ते १८ पर्यंत सर्वांना समान हक्क दिले आहेत.जाती, धर्म, पंथ, लिंग वा जन्म यावर आधारित भेदभाव न करता समान संधी व न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न संविधान करते.म्हणजेच, गोपाळकाला जे प्रत्यक्ष लोकजीवनातील समानतेचे व सामूहिकतेचे प्रतीक आहे तेच संविधानातील सामाजिक समभावाशी सुसंगत आहे. असे प्रतिपादन मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी यावेळी बोलताना केले. शाळेच्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, शिक्षणविस्तार अधिकारी डॉ. विजय बागुल, कैलास सांगळे, केंद्रप्रमुख विजय निरगुडे, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या अध्यक्ष तथा सरपंच संगिताताई आव्हाड, उपसरपंच मोहिनीताई खताळे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदाम पानसरे व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
