
नांदगाव ( प्रतिनिधी )नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठाण पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आवारात रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांच्या दुर्लक्षामुळे पाणी तुंबले असून एक प्रकारचा तलाव तयार झाला आहे. त्यामुळे येथील बौद्ध नागरिक संतप्त झाले असून त्वरित सदरचे पाणी नाली करून काढून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आवारात पाणी तुंबत असल्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग नांदगाव यांना रस्त्याच्या कडेला नाली करणेबाबत व अतिक्रमण निश्चित करणे बाबत रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतने पत्र दिले होते. त्या पत्राला केराची टोपली दाखवत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. तसेच बौद्ध नागरिकांनी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला जुलै 2025 या महिन्यात सदरचे तुंबत असलेले पावसाचे पाणी नाली करून काढून देण्याबाबत अर्ज दिला होता. सदरचे पाणी काढून देण्यात यावा यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच सौ. सुनंदा बागुल यांनी होकार दिला असताना देखील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मगर यांनी अद्याप पर्यंत दखल घेतलेली नाही. रोहिले बुद्रुक येथे दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण गावातील पाणी व रस्त्यावरील पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारात तुंबलेले आहे. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जुन्या गावठाणापर्यंत नाली करून हे पाणी काढून दिल्यास पुतळा जवळ पाणी तुंबू शकत नाही. परंतु ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

गेल्या कित्येक वर्षापासून रोहिले बुद्रुक येथील बौद्ध नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी सदरचे पाणी नाली करून काढून देण्यासंदर्भात ग्रामपंचायत तिकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत तरीदेखील ग्रामपंचायतीने व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पाठ फिरवली असून ते राजकारण करत आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य या तुंबत असलेल्या पाण्याची नाली करून काढून देत नसेल तर तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हे देखील याकडे दुर्लक्ष करत असेल तर दोन्ही विभागा च्या विरोधात लवकरच आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम बागुल यांनी दिला आहे.
