
नाशिक:- (प्रतिनिधी ) साहित्यनिर्मिती ही आतून येते, तेव्हाच ती वाचकाला वाचनानंदासह विचारप्रवर्तक ठरत असते. साहित्याच्या अंतरंगात नेहमी परिवर्तनाची सत्यता असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी दिलीप पाटील यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात कवी दिलीप पाटील ‘दुरून कुठून तरी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी होते. दिलीप पाटील पुढे म्हणाले की, सामान्य माणूस जगण्याची धडपड, होणाऱ्या वेदना सहन करतो. तरीही तो जगण्याची उमेद सोडत नाही. वर्षानुवर्षे कष्ट सोसत हतबल न होता दुरून कुठून तरी आशेचा किरण त्याला दिसतो. भोवताली निराशा असली तरी आशावाद मात्र शाश्वत असला पाहिजे. समाजव्यवस्था बदलत असताना माणसांमधली माणूसपणाची ओल कमी होत आहे. याचे चिंतन या कविता संग्रहात मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगून संग्रहातील काही कविताही त्यांनी सादर केल्या. कामगार कवी काशीनाथ वेलदोडे आणि बाळासाहेब उगले या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक पाटील यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (१९) सल्तनत राठोड ‘गोरमाटी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
