
तळवाडे :(प्रतिनिधी )येथे सुरू असलेल्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सव प्रसंगी ६ व्या दिवसाचे कीर्तनकार संविधान समता दिंडी संचालक, ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध वक्ते व कवी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी आपल्या कीर्तनातून विविध विषयावर भाष्य केले. स्त्रियांना मानाचे स्थान देऊन त्यांना समानतेची वागणूक देण्यात यावी. तरुणांना निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून कायम स्वरुपी तो आचरणात आणावा. गट तट, जात धर्म, उच्च निच ही भावना न बाळगता बंधुभावाने गावाने वागावे. या समवेत अनेक विषयावर भाष्य करत भारतीय संविधानातील समता, बंधुता, एकता, एकात्मता या गोष्टींचा प्रकर्षाने उल्लेख करत, संत साहित्य, संत विचारधारा या विषया उजाळा दिला. गावातील पोलीस पाटील श्री. किरण निकम यांच्या वतीने गावातून १० वी तसेच १२ वी मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम ३ येणाऱ्या विद्यार्थांचा `गुणवंत विद्यार्थी पुरस्कार ‘ देऊन सन्मानित करत असतात. गावातून अनुक्रमे प्रथम आलेले विद्यार्थी कु. वैष्णवी बाळकृष्ण खाडे, पवन साताळे, सागर कैलास फड यांचा महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील यांनी महाराजांची कीर्तन सेवा घेतलेली होती, महाराजांना कुळवाडी भूषण रयतेचा राजा छ. शिवाजी आणि आंबेडकर ग्रंथायन हे ग्रंथ देत वैचारिक भेट दिली. प्रसंगी गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ गावकरी, भजनी मंडळ, वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, तरुण वर्ग आणि समस्त तळवाडे ग्रामस्थ उपस्थित होते.
