
नाशिक. (प्रतिनिधी ) : जीवनात संस्कार आवश्यक आहेत. माता-पित्यांसह गुरुजन आपल्यावर संस्कार करून आपल्याला दिशा देतात. त्याचप्रमाणे चांगले विचार आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घडवत असल्याने सुविचार हाच जीवनाचा प्रमुख गाभा आहे, असे प्रतिपादन क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि माजी नगरसेवक दामोदर मानकर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘सुविचार खजिना’ या साहित्यकृतीवर त्यांनी हुतात्मा स्मारकात संवाद साधला. ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे अध्यक्षस्थानी होते. श्री.मानकर पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदायाचे संस्कार घरात असल्यामुळे साधुसंतांच्या सहवासात खूप ऐकायला-शिकायला मिळाले. सुविचार संग्रह करण्याचा छंद लागला. सामाजिक आणि राजकीय जीवनात अनेक पदांवर काम करताना आलेल्या अनुभवातून स्वतःही सुविचार तयार केले.

त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला. हे पुस्तक सर्वत्र पोहोचल्याने समाधान लाभले, असेही ते म्हणाले. सुनंदा पाटील आणि अजित कुलकर्णी यांना ग्रंथभेट देण्यात आली. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन केले तर अलका दराडे यांनी आभार मानले. दरम्यान, या उपक्रमात येत्या मंगळवारी (दि.१८) ज्येष्ठ साहित्यिक काशीनाथ महाजन हे ‘प्रतिभेचं नंदनवन’ या साहित्यकृतीवर आपले विचार मांडणार आहेत.फोटोओळी:-गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या ‘पुस्तकावर बोलू काही…’ या उपक्रमात बोलताना दामोदर मानकर. समवेत ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे.
