
जालना: (प्रतिनिधी भारत सरकारमार्फत राबविण्यात येत असलेल्या जनगणना 2027 कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सध्या घरगणना (HOUSE LISTING) करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी नियुक्त केलेले प्रगणक व पर्यवेक्षक यांना इंधन पुरवठ्यात प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिले आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्र जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना जारी करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेले घरगणना कार्य दिनांक 16/05/2026 ते दिनांक 14/06/2026 या कालावधीत प्रत्यक्ष गावस्तरावर राबविण्यात येत आहे. यामुळे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामासाठी विविध गावांमध्ये जाऊन कामकाज करावे लागत आहे. मात्र, सध्या सर्वत्र पेट्रोल व डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. या लांबच लांब रांगांमुळे जनगणनेच्या राष्ट्रीय कामामध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
यावर तातडीने उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जनगणना कामासाठी नियुक्त केलेल्या सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना जनगणना विभागामार्फत ओळखपत्रे देण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांनी आपले अधिकृत ओळखपत्र किंवा नियुक्ती आदेश दाखवल्यानंतर त्यांना पेट्रोल पंपावर रांगेत उभे न करता, शक्य तितक्या प्राधान्याने पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश पेट्रोल पंप चालकांना देण्यात आले आहेत.
हे काम राष्ट्रीय महत्त्वाचे असून या कार्यास आपल्या स्तरावरून सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या आदेशाची प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सर्व चार्ज अधिकारी यांनाही रवाना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जनगणना कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कामाला गती मिळणार आहे.
