
सोनांबे (बातमीदार) अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांचा सामना करण्यासाठी सिन्नर पोलीस ठाणे आणि पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सिन्नर तालुक्यातील मुख्याध्यापक, पोलीस पाटील उपस्थित होते.यावेळी निफाड उपविभागीय पोलिस अधिक्षक कांतीलाल पाटील, गटविकास अधिकारी अशोक भवारी, सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, वावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जाधव, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. विजय बागुल, कैलास सांगळे, सुनिता अहिरे आणि एस.बी. देशमुख, केंद्रप्रमुख उपस्थित होते.

. सिन्नर तालुक्यातील 166 प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, 64 माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि 37 पोलीस पाटील उपस्थित होते.कार्यशाळेच्या उद्घाटनाला संबोधित करताना, गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी सांगितले की, “अंमली पदार्थ हे समाजासाठी मोठा धोका बनले आहेत. यामुळे मानसिक ताणतणाव वाढत आहेत आणि समाजातील विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर ठोस उपाय शोधण्यासाठी एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”सिन्नर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी शिक्षकांच्या महत्त्वावर भाष्य करतांना सांगितले, “कुटुंबातील संवाद हरवला आहे, आणि तो पुन्हा जोडण्याचे एक महत्त्वाचे माध्यम शिक्षण आहे. यासाठी शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी, निफाड उपविभागीय पोलिस अधिक्षक कांतीलाल पाटील यांनी भावनिक आवाहन केले आणि सांगितले की, “विभक्त कुटुंबांमुळे पालक मुलांवर रागावण्याची संधी गमावू लागले आहेत. शाळेने या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.” तसेच, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातील, जसे की निबंध लेखन, चित्रकला, पथनाट्य, लघूपट इत्यादी. स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठीचे पोस्टर व शपथपत्र यांचे गावपातळीवर वितरण करण्याचे नियोजन पोलीस विभागाने केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख विजय निरगुडे यांनी केले आणि अंमली पदार्थ विरोधी शपथ घेतली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिन्नर पोलीस ठाणे व पंचायत समिती शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाच्या अखेरीस, पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी आभार व्यक्त केले. सामाजिक दृष्टीकोनातून शिक्षण आणि पोलीसांची एकत्रित कार्यवाही, अंमली पदार्थांच्या विरोधात सामूहिक संघर्षाची प्रेरणा देणारी ठरली.
