
नाशिकरोड:- (प्रतिनिधी )
जीवनाला मिळाली अशी ही दवा…
पुस्तकांनी दिला श्वास जगण्याला नवा
अशा शब्दातून पुस्तकांचे महत्त्व सांगत कवी प्रशांत केंदळे यांनी विविध कविता सादर करत उपस्थित विद्यार्थिनींना मंत्रमुग्ध केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.बिंदू रामराव देशमुख कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयात मराठी वाड्.मय मंडळाचे उद्घाटन कवी केंदळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. श्री.केंदळे पुढे म्हणाले की, विद्यार्थिनींनी आत्मचरित्र आणि विविध पुस्तके वाचून त्यामधील ज्ञान आत्मसात केले पाहिजे. दिवसभरात घडलेल्या घटना रोजनिशीत लिहिल्या पाहिजे. कोणत्याही विषयावर सातत्याने लिखाण केले पाहिजे. त्यातून लिखाणाचे कौशल्य निर्माण होईल, असे सांगून कवितेची निर्मिती, कवितेचे प्रकार याविषयी त्यांनी माहिती दिली. स्वतःच्या लिखित कविता त्यांनी चालीसह सादर केल्या. ‘गुलमोहराचं कुकू,’ ’माय,’ ‘बाप लेकीची कहाणी’ यांसह काही निसर्ग कविता सादर करताना कवितेची निर्मिती प्रक्रियादेखील उलगडून सांगितली. अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थिनींनी वाचन, लेखन कौशल्ये विकसित करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे प्राचार्य डॉ.समीर लिंबारे यांनी सांगितले. प्रास्ताविकातून मराठी विभागप्रमुख प्रा.स्मिता माळवे यांनी मराठी वाड्.मय मंडळात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वाणिज्य विभागाचे प्रा.केतन बोरसे, स्नेहा ब्यागारी, चैताली चौधरी यांनीही सहकार्य केले. परिचय प्रा.डॉ.योगिता भामरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन विद्यार्थिनी समरीन शहा तर आभार प्रदर्शन अनन्या जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
