
मनमाड (प्रतिनिधी,भागवत झाल्टे )रापली गेटजवळील खांबा क्रमांक 255/24-25 च्या दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे सुमारे 80 वर्षांच्या अनोळखी वयोवृद्ध इसमाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सुमारे 7:30 वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला.रेल्वे गँगमन साईनाथ भालचंद्र संसारे व नवनाथ मोठा भाऊ झाल्टे हे आपली ड्युटी बजावत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती तत्काळ समाजसेवक व पत्रकार भागवत झाल्टे यांना दिली. झाल्टे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चांदवड पोलीस स्टेशनचे पीआय कैलास वाघ तसेच रेल्वे आरपीएफ यांना घटनेची माहिती दिली. ही घटना साधारण पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान झालेली आहे असा प्राथमिक अंदाज आहेयानंतर चांदवड पोलीस स्टेशनचे हवालदार (क्र. 2012) गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल (क्र. 1235) शेळके तसेच रेल्वे आर पी एफ निलेश सोमवंशी व Rpf विनायक भोजने (मनमाड) यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पाटील सागर पवार (वडगाव पंगु) व निवृत्ती पगार (वागदर्डी) हेही उपस्थित होते.पोलिस व आरपीएफ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून अनोळखी वृद्धाचा मृतदेह चांदवड शासकीय रुग्णालयात रवाना केला. मृत व्यक्ती सुमारे 80 वर्षांचे असून ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच रापली, कातरवाडी, वडगाव पंगु, वागदर्डी परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी जमले होते.घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशन व रेल्वे प्रशासन करीत आहेत.
