
नाशिक :(प्रतिनिधी )कविता कवीसह वाचकाचं आयुष्य समृद्ध करत जाते. आपल्या मनातील भावनांना काव्यरूपात सादर केल्यामुळे कविता जगण्याचा अविभाज्य घटक बनते. कारण कविता हा जाणिवांचा हुंकार आहे, असे प्रतिपादन पिंपळगाव बसवंत येथील कवी प्रा.संजय जगताप यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘प्रवाहपतित’ या साहित्यकृतीवर हुतात्मा स्मारकात संवाद साधताना ते बोलत होते. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते अध्यक्षस्थानी होते. प्रा.जगताप पुढे म्हणाले की, प्रवाहपतित हा काव्यसंग्रह निर्माण होताना घडणाऱ्या विविध घटनांवर मी चिंतन केलं. तसेच कौटुंबिक, सामाजिक परिस्थिती अनुभवत काव्यनिर्मिती करत गेलो. कवीचं मन हे नेहमी जागं असेल तरच उत्तम कविता निर्माण होते, असे सांगून संग्रहातील काही कविता त्यांनी सादर केल्या. सुप्रसिद्ध साहित्यिक सुहास टिपरे आणि भास्कर देशमाने या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुनंदा पाटील यांनी आभार तर अलका दराडे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, येत्या शुक्रवारी (दि.८) ज्येष्ठ पत्रकार पोपटराव देवरे हे ‘उमराणा भूषण’ या साहित्यकृतीवर आपले विचार मांडणार आहेत.फोटोओळी:-गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या ‘पुस्तकावर बोलू काही…’ या उपक्रमात बोलताना प्रा.संजय जगताप. समवेत माजी आमदार नानासाहेब बोरस्ते.
