
बा.सी. मर्ढेकरांच्या कवितांमधील स्व-चिंतनाचा आशय तेवढा अलगद उचलून घ्यावा आणि त्याचे जीवंत रुप कुठे सापडेल का, याचा शोध घ्यावा…तर ते मर्ढेकरांच्याच घरात म्हणजे त्यांच्या मुलाच्या रुपाने बघायला, अनुभवायला मिळावे. राघव मर्ढेकर. मर्ढेकरांचे सुपुत्र. दिल्लीच्या पंजाबी बाग भागात अख्खं आयुष्य त्यांनी काढलं आणि ३१ मे २०२६ रोजी त्यांनी वयाच्या ७८व्या अखेरचा श्वास घेतला.
परराष्ट्र खात्याचे विशेष सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य मर्ढेकरांच्या लौकीकाचे वलय गुंडाळून काढू शकले असते. पण सामाजिक जिवनापासून पूर्णपणे अलिप्त, प्रसिद्धीपराङमुख असे हे व्यक्तिमत्व होते. प्रतिभावंतांच्या घरात प्रतिभावंत जन्माला येतात, पण त्यांच्या प्रतिभेला मोकळे आकाश मिळण्याचे प्रसंग जगात दुर्मिळ आहेत. बहुतांशी तर स्वतःच त्या जगापासून लांब राहण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला आहे. राघव मर्ढेकर हे त्यातलेच. कमालीचे प्रतिभावान कवी. पण त्यांनी स्वतःच आपल्या कवितांच्या प्रसिद्धीला एक मर्यादा घालून दिली. काही वेबसाईट्सवर त्यांच्या कविता वाचायला मिळतील. एक पुस्तकही अमेझॉनवर आहे. पण तेही ऑनलाईन वाचता येईल असेच.
दिल्ली लोकमतला शिफ्ट झाल्यावर एक दिवस डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा फोन आला. त्यांनी मर्ढेकरांच्या दिल्लीतील घराबद्दल सांगितले. तिथे त्यांचे सुपुत्र राघव मर्ढेकर राहतात. त्यांना भेटून एखादी बातमी होऊ शकते, असे सूचवले. बरेच प्रयत्न करून ‘पंजाबी बाग, दिल्ली’ एवढाच पत्ता त्यांच्या हाती लागला. देशाच्या राजधानीत एवढ्या पत्त्यावर एका माणसाचा शोध घेणे किती अवघड आहे, हे सांगण्याची गरज नाही. पण पंजाबी बाग मेट्रो स्टेशनवर उतरून दोन दिवस काही वस्त्या रिक्षाने फिरलो. घरावरील, फाटकावरील पाट्या वाचल्या. काहीच हाती लागले नाही. मर्ढेकरांचे घर ज्या भागात होते, तो परिसर फाळणीनंतर निर्वासितांची वस्ती म्हणून ओळखला जायचा. त्याचेच नाव पुढे पंजाबी बाग पडले. एवढाच एक धागा माझ्याकडे होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी यश आले. एका घराच्या बाहेर फाटकावर राघव मर्ढेकरांचे नाव वाचले. फाटक उघडून आत गेलो. बरेच आवाज दिले, डोअरबेल वाजवली. काही प्रतिसाद मिळाला नाही. घर लॉक आहे की नाही, हेही कळायला मार्ग नव्हता. मोबाईल काढून घराचा फोटो घेणार तेवढ्यात एकाने टोकले. ती व्यक्ती म्हणजे राघव मर्ढेकरांचा भाचा. शेजारचे घर त्यांचेच. माझा परिचय दिल्यावर त्यांनी घरी नेले आणि राघव मर्ढेकर सध्या घरी नसल्याचे सांगितले. खूप चौकशी केल्यावर त्यांनी फोनच लावून दिला.
‘Interview नहीं होगा, मिलने आ सकते हो’… एवढं सांगून दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ दिली. आराम खुर्चीवर बसून दोन तास फक्त गप्पा झाल्या. तरीही एखादी बातमी करता येईल का, असं मध्येमध्ये विचारायचो. पण ते ठाम होते. कमालीचे दिलखुलास आणि तेवढेच Introvert. ज्या घरात माझी राघव यांच्याशी भेट झाली त्याठिकाणी मर्ढेकरांचे वास्तव्य होते. आपण त्याच घरात बसून मर्ढेकरांच्या मुलासोबत गप्पा मारतोय, ही बाब कुठल्याही Exclusive बातमीपेक्षा माझ्यासाठी मोठी होती. राघव यांनी अख्ख्या घराची सफर घडवली. आईच्या, बाबांच्या आठवणी सांगितल्या. मात्र एक खोली दाखवण्याचे त्यांनी टाळले. त्यामुळे उत्सुकता वाढली. ‘आई-बाबांनी एकमेकांपासून लांब असताना लिहीलेली पत्र त्या खोलीत आहेत. माझ्या कवितांची वही त्याच खोलीत आहे. मला ते कुणाला दाखवायचे नाही,’ असं राघव यांनी स्पष्टच सांगितलं. आता मला त्या पत्रांची बातमी करण्याचा मोह होऊ लागला. ‘पण ही पत्र कवीवर्य मर्ढेकरांची नाहीत, माझ्या आई-बाबांची आहेत. एकमेकांना लिहीलेली अत्यंत खासगी पत्र आहेत. हा तुझ्या बातमीचा विषय होऊ शकत नाही. तू हजारवेळा माझ्या घरी आलास तरीही तुला ती वाचायला मिळणार नाहीत,’ असं सांगितल्यावर विषयच संपला.
राघव यांचा मराठीशी संबंध फारच कमी आला. त्यांच्या कविताही इंग्रजीत आहेत. त्यांनी साताऱ्यातील मर्ढे गावातील वडिलांच्या घराची काळजी घेतली. देखभाल करणाऱ्यांसोबत नियमित संपर्कात होते. पण स्वतःचं आयुष्य त्यांनी फक्त कुटुंबापुरते मर्यादित ठेवलं. दिल्लीतील वास्तूमध्ये त्यांनी ‘मर्ढेकर’ जतन केले आणि आपल्या आई-वडिलांच्या आठवणींचा दरवळ सुद्धा कायम ठेवला.
दिल्ली सोडताना आणि सोडल्यावरही काही दिवस मी राघव यांच्या संपर्कात होतो. अलीकडच्या काही वर्षांमध्ये संपर्क राहिला नाही. पण ‘मर्ढेकरांच्या घरात’ राघव यांच्यासोबत झालेल्या त्या दोन तासांच्या गप्पा माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. राघव यांनी व्यक्तिगत जिवनातील अनेक प्रसंग सांगितले. सरकारी अधिकारी असताना आलेले अनुभव सांगितले. पंजाबी बागमध्ये घर होण्याची कहाणी सांगितली. मर्ढेकरांच्या आठवणी सांगितल्या. आईच्या आठवणी सांगितल्या. आपण स्वतः कवी आहोत, हे कळताना आणि कविता जन्माला येताना झालेल्या वेदनाही त्यांनी सांगितल्या. पण ती एक खोली आणि मर्ढेकरांची पत्र… तेवढं मात्र गुपित ठेवलं.
राघव मर्ढेकरांच्या As 70 Nears या कवितेतील ओळींप्रमाणे…
I think it’s time to now sit back
And stop searching for another day
I’ll tell myself the tales I own
Of things that happened along my way
I would say if ever asked
Life’s been a merry ride so far
Marked by treasures found and lost
And visions near and then afar
We leave so many things unsaid
Using words that should’nt have a voice
We live deluded that we control
Ourselves and our every choice
Nor you and I; the Fate’s decide
What the morrows hold in store
I delude myself; for the heart is young
I won’t sit here anymore.
अलविदा राघव सर!
@ नितीन नायगांवकर
