
सिन्नर (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या निर्देशानुसार महसूल विभागामार्फत राज्यभर दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी महसूल दिन व दिनांक ०१ ते ०७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महसूल सप्ताह २०२५ साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सिन्नर तहसील कार्यालयामार्फत महसूल दिनाच्या दिवशी महसूल सप्ताहाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. सुरेंद्र देशमुख, तहसीलदार सिन्नर होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दत्ता वायचळे, निवृत्त नायब तहसीलदार, तसेच श्री. दत्ता शेळके, सदस्य ग्राहक संरक्षण प्राधिकरण उपस्थित होते. या प्रसंगी सर्व नायब तहसीलदार, सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी, शिपाई, पोलीस पाटील, महसूल सेवक तसेच सिन्नर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.महसूल सप्ताहाच्या प्रारंभाच्या निमित्ताने तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकूण १०७ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.कार्यक्रमात सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच पुढील वर्षात अजून उत्तम कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर उत्पन्नाचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले, शिधापत्रिका संबंधित लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांची डीबीटी प्रणालीवर पडताळणी देखील करण्यात आली.विशेष उल्लेखनीय म्हणजे तहसीलदार सिन्नर श्री. सुरेंद्र देशमुख यांना नाशिक जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व उपस्थितांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या वैद्यकीय पथकाचेही आभार मानण्यात आले.यावेळी तहसीलदार श्री. सुरेंद्र देशमुख यांनी सिन्नर तालुक्यात मागील वर्षभरात करण्यात आलेल्या महत्वाच्या कामांचा आढावा घेतला व येणाऱ्या काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. महसूल सप्ताहात करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे श्री. दत्ता वायचळे, श्री. दत्ता शेळके तसेच निवासी नायब तहसीलदार श्री. सागर मुंदडा यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री गणेश कदम ग्राम महसूल अधिकारी यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता प्रशासन नायब तहसीलदार श्री. संजय धनगर यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
