
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )नवी मुंबई पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल यांची खालापूर जिल्हा रायगड ह्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधीक्षक ह्या पदी बदली झाली आहे.त्यांच्या बदलीने सर्वसामान्य नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.नवी मुंबई पोर्ट विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ विशाल नेहूल हे पोलिस विभागात उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी सर्वांना समान वागणूक दिली, कधीही भेदभाव केला नाही. गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी समाजातील प्रत्येक व्यक्तीस त्यांनी उचित सन्मान दिला, तसेच त्यांचे प्रश्न समजावून घेतले. त्यातील अनेक प्रश्न त्यांनी सामंजस्याने सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले. परंतु गुंड प्रवृत्तीला त्यांनी कधीही थारा दिली नाही. त्यांचा योग्य मार्गाने समाचार घेतला. उरण तालुक्यातील आदिवासी जमीन अवैध्य हस्तांतरण प्रकरणात त्यांनी सखोल चौकशी करून अट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. सदर केसचा सखोल अभ्यास करून मुंबई उच्च न्यायालयात आणि जिल्हा सत्र न्यायालयात योग्य भूमिका मांडल्यामुळे आदिवासी महिलेला न्याय मिळण्याचा मार्ग सुकर झाला. पोर्ट विभागाअंतर्गत येणाऱ्या उरण, उलवे, मोरा, न्हावा शेवा पोलिस स्टेशन मध्ये अशा प्रकाराचे नोंद केलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांनी स्वतः तपास करून त्याचा योग्य पाठपुरावा करून गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले. डॉ विशाल नेहूल यांचे तीन गुण घेण्यासारखे आहेत त्यातील पहिला गुण म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. त्यांनी नेहमीच सत्याची बाजू घेतली, चुकीच्या गोष्टीचे कधीही समर्थन केले नाही. त्यांचा दुसरा गुण म्हणजे त्यांची अभ्यासू वृत्ती. प्रत्येक केसचा सखोल अभ्यास करून त्या केस संदर्भातील सर्व कायद्यांचा अभ्यास करणार, कायद्यातील तरतुदीबाबत शंका असल्यास त्याचे मार्गदर्शन घेणार आणि गुन्हेगारांना शासन कसे होईल ह्याबाबत प्रयत्नशील राहणार. तिसरा गुण म्हणजे त्यांचा शांत स्वभाव. अगदी मृदु भाषिक, समोरच्या व्यक्तीचे शांतपणे ऐकून घेऊन नंतरच बोलणे, चर्चा करताना घाई न करता प्रत्येकाला बोलण्याची संधी देणे, रात्री उशिरापर्यंत काम करणे. ते कधी ओरडून किंवा रागावून बोलल्याचे दिसून आले नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास असे प्रामाणिक पोलिस अधिकारी मिळणे अवघड आहे. त्यांची बदली झाल्याचे समजताच सर्वसामान्य जनतेला वाईट वाटले आणि त्यांनी हळहळ व्यक्त केली.मात्र सर्वांच्यावतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या जागी नियुक्ती मिळालेले किशोर गायके यांचे सर्वांनी मनापासून स्वागत केले असून त्यांनी डॉ विशाल नेहूल यांनी केलेल्या कामापेक्षाही चांगले काम करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवावा अशी अपेक्षा ॲड राजेंद्र मढवी उपाध्यक्ष उरण सामाजिक संस्था यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी व्यक्त केली आहे.
