
नाशिक (प्रतिनिधी) :-आपल्या अवतीभवती वावरणारी माणसं आपल्या जीवनाला कलाटणी देतात. प्रत्येकाच्या मनात घर करणारी अशी आगळीवेगळी माणसं खऱ्या अर्थाने बहुआयामी असतात, असे प्रतिपादन मालेगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.विनोद गोरवाडकर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमाचे १६७वे पुष्प गुंफताना ‘बावनकशी’ या पुस्तकावर ते बोलत होते.अध्यक्षस्थानी वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी होते. डॉ.गोरवाडकर पुढे म्हणाले की, विविध माणसं आपल्याला प्रेरणा देतात. बावनकशी या पुस्तकात भावलेल्या आणि जगण्यासाठी नवचैतन्य देणाऱ्या व्यक्तींबद्दल लिहिले आहे. संकटकाळी आपल्या मदतीला धावून येणारी माणसं देवमाणसं असतात. लोकसाहित्य, भविष्य, उद्योग, साहित्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंत माणसं या माध्यमातून जवळून टिपता आली.संप्रदाय कोणताही असो पण भावलेले माणसं नैतिकता जपणारी आणि प्रचंड प्रभावशाली असतात. ती माणसं मनात घर करत असतात. आपलं जीवन संपन्न करणारी माणसं आपल्या आयुष्यात येतात, हे आपले परमभाग्य असते, असेही ते म्हणाले. विजय बागडे आणि हेमंत वडगावकर या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले आणि ॲड.मिलिंद चिंधडे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (५) पिंपळगाव बसवंत येथील कवी प्रा.संजय जगताप ‘प्रवाहपतित’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
