
दहिवाडी (ता. सिन्नर)येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती तसेच विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती यांची नुकतीच यशस्वी स्थापना करण्यात आली. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार आयोजित पालक सभेत या समित्यांची निवड पार पडली.शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब जगदाळे तर उपाध्यक्षपदी श्री. बाळकृष्ण पोलगर यांची सर्वानुमते निवड झाली. याशिवाय, सखी सावित्री समितीच्या अध्यक्षपदाची धुरा देखील भाऊसाहेब जगदाळे यांच्याकडेच सोपविण्यात आली. महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी शोभा शेळके तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब संधान यांची बहुमताने निवड करण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब संधान, सदस्य, माजी अध्यक्ष अर्जुन माळी, पोलीस पाटील यांच्यासह सर्व वर्गातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व समिती प्रमुखांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापक सोमनाथ कराड यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला, तर सुनिल साबळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद राऊतराय, शोभा शेळके, शितल वाघचौरे, नितीन सोनवणे व हंसराज कारभारी यांनी विशेष मेहनत घेतली. शाळा आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भक्कम पाऊल उचलले गेले असून या समित्यांच्या माध्यमातून शाळा विकासाच्या दिशा ठरणार आहेत, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
