
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथिल अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील विद्यालयात ‘सर्पांविषयीचे समज व गैरसमज’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रा. एस. टी. जाधव होते.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मनातील सापांविषयीची भीती दूर व्हावी, तसेच त्यांना सापाच्या विषारी, बिनविषारी, निमविषारी जातींची माहिती व्हावी, त्यांची गुणवैशिष्ट्ये अवगत व्हावीत या हेतूने नाशिक येथील अनुसया कमल फाउंडेशनचे पदाधिकारी तथा मनमाड येथील सर्पमित्र विजय उगले यांनी विविध प्रजातीच्या सापांचे छायाचित्र दाखवून विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांनी नागपंचमी सणाचे महत्व विविध पौराणिक कथांचा दाखला देत विशद केले.

तसेच सापांविषयीचे समज गैरसमज शास्त्रोक्त पद्धतीने अधोरेखित केले. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे व शंकांचे समाधान करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. पी. यु. शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले तर आभार डी. एस. जमधाडे यांनी मानलेत.
