
नांदगाव (प्रतिनिधी) वाघाचे संरक्षण ही काळाची गरज आहे निसर्ग साखळीतील प्रत्येक घटक एकमेकांशी निगडित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमधून वन्यजीवांविषयी जागरूकता वाढवावी आणि समाजात पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवावा असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एन.भवरे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन केले. येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै निमित्ताने वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, सिनेटर सदस्य डॉ.सी.बी.निगळे,प्रा. के.आर.खंदारे,प्रा.एस.सी.अहिरे, श्रीमती प्राजक्ता कडलग,आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात Tiger -The King of Jungle या विषयावर आधारित माहिती पूर्ण डॉक्युमेंटरी (चित्रफीत) दाखविण्यात आली. ज्यात वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण शिकारीचे परिणाम व संवर्धनाचे प्रयत्न याविषयी प्रभावी माहिती देण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एम.बी.आटोळे यांनी केले.यावेळी ते म्हणाले की, वाघ हा जंगलचा राजा असून त्याचे अस्तित्व म्हणजे संपूर्ण जंगलाचा आरोग्य दर्शक वाघ वाचला तर जंगल वाचेल आणि जंगल वाचले तर पर्यावरण टिकेल असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा जाधव यांनी केले. तर प्रा.अंकुश लव्हाटे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. असून वन्यजीव संवर्धन व पर्यावरण रक्षणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे प्राध्यापक वर्गाने सांगितले.
