
नाशिक:-( प्रतिनिधी )नदी आणि आपली सर्वार्थाने कृतज्ञतापूर्वक बांधिलकी असते. कारण प्रत्येक गावाची जीवनदायिनी नदी म्हणजे त्या-त्या गावाचं खऱ्या अर्थाने सांस्कृतिक वैभव असते, असे प्रतिपादन मालेगाव येथील ज्येष्ठ कवी निंबा भागा निकम यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ते ‘गिरणाई’ या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मंगला सुरसे होत्या. श्री.निकम पुढे म्हणाले की, आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना रुजली पाहिजे. गिरणा नदीने आम्हाला भरभरून दिले. त्या सामाजिक संवेदना जागृत ठेवून नदीकाठच्या विविध अनुभवांची शिदोरी या संग्रहातील कवितांमध्ये आहे. गिरणा नदीकाठच्या परिसरातील सर्व आठवणी या कवितांमधून मांडण्याचा प्रयत्न केला. नदी सुजलाम सुफलाम करत अनेकांचे जीवन फुलवत असते, असेही ते म्हणाले. अलका दराडे आणि डॉ.सुरेखा जाधव यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन तर सुहास टिपरे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१) प्रा.डॉ.विनोद गोरवाडकर ‘बावनकशी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
