
अकोला- बिर्ला कॉलनी येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये नुकत्याच झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज (२३ जुलै २०२५) जाहीर करण्यात आला. यानंतर तात्काळ नवनियुक्त प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लोकशाही मूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे आणि त्यांच्यात नेतृत्वगुणांचा विकास करणे हा या संपूर्ण प्रक्रियेमागील मुख्य उद्देश होता. शाळेच्या सभागृहात आयोजित या विशेष कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका डॉ.श्वेता दिक्षित ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी गोपाल सुरे,डायट चे इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक बालाजी शेळके सर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुपारच्या सत्रात शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. श्वेता दिक्षित ह्या अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागच्या सुपर वाईसर मेघा कुलकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख स्वप्नील अंभोरे हे उपस्थित होते. यावेळी माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या निवडणूक समितीने अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवडणुकीचे निकाल घोषित केले. हेड बॉय , हेड गर्ल , स्पोर्ट कॅप्टन आणि विविध सदनांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. माध्यमिक विभागात शाळेचा हेड बॉय सुगत गोपनारायण तर हेड गर्ल म्हणून गायत्री बाभुळकर तर प्राथमिक विभागात हेड बॉय म्हणून शौनक रत्नाळीकर व हेड गर्ल म्हणून स्वरा देशमुख या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर, शाळेच्या मुख्याध्यापकांनी नवनियुक्त विद्यार्थी मंत्रिमंडळाला गोपनीयतेची आणि जबाबदारीची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखण्याची, शाळेच्या नियमांचे पालन करण्याची, विद्यार्थ्यांचे हित जपण्याची आणि शाळेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची शपथ घेतली.

यावेळी मुख्याध्यापिका डॉ.श्वेता दिक्षित यांनी आपल्या भाषणात सर्व विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना त्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांबद्दल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या , “तुम्ही केवळ पदांवर निवडून आलेला नाही, तर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला आहात. या संधीचा उपयोग तुम्ही स्वतःच्या विकासासाठी आणि शाळेच्या उन्नतीसाठी करावा. नेतृत्व म्हणजे केवळ अधिकार नाही, तर ती एक मोठी जबाबदारी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.” तसेच यावेळी प्रमुख पाहुणे गोपाल सुरे व बालजी शेळके सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले आणि शाळेच्या हितासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना, शिस्त आणि लोकशाही प्रक्रियेबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाली. नवनियुक्त विद्यार्थी परिषद आता पुढील शैक्षणिक वर्षात शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सज्ज झाली आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन ईश्वरी गावंडे अविका सिन्नाल्लू , श्रावस्ती तेलगोटे ह्या विद्यार्थिनिंनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली अवचार यानी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार करण्याकरिता शाळा समन्वयक वैशाली अवचार, क्रीडा विभाग प्रमुख स्वप्नील अंभोरे, प्राथमिक विभागाच्या निरीक्षक मेघा कुळकर्णी, इंग्रजी विषय शिक्षिका सुचिता खांडेकर, संगणक शिक्षिका वैशाली पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
