
गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित “पुस्तकावर बोलू काही'” हा उपक्रम हुतात्मा स्मारक येथे आठवड्यातून दोनदा मंगळवार व शुक्रवार असतो .या उपक्रमाला 4 फेब्रुवारी 2024 ला सुरुवात झाली व पुढील पाच वर्षे तो अविरत सुरू राहणार आहे .आत्तापर्यंत 112 लोकांनी आपल्या पुस्तकावर ऐसपैस गप्पा मारल्या. मला माझ्या “वेदनेच्या पलीकडे” काव्यसंग्रहावर बोलण्याची संधी पहिल्या 50 लेखकात मिळाली. 100 लेखकांचा हा गौरव ग्रंथ प्रकाशित होत आहे. संपूर्ण जगातील हा पहिला अभिनव उपक्रम आहे .माननीय सुरेश पवार सरांनी सर्व लेखक व कवींना प्रकाशात आणले. आम्हाला व्यक्त व्हायला हक्काचे व्यासपीठ मिळाले. वाचन संस्कृतीला पाठबळ लाभले. “वेदनेच्या पलीकडे” माझा पहिला कवितासंग्रह वयाच्या 68 व्या वर्षी प्रकाशित झाला. माननीय सुरेश पवार सरांमुळे गिरणदूत प्रकाशन, श्री. पवार सरांची प्रस्तावना लाभली .27 ऑक्टोबर 2023 ला प्रकाशन झाले . नऊ वर्षांपूर्वी माझा मोठा चिरंजीव डॉ.सुरज पाटील स्त्री रोगतज्ञ याचे पिंपळगाव बसवंतला अपघाती निधन झाले. नंतर आम्ही नाशिकलाआलो व सर्वांच्या प्रेरणेने साहित्य प्रवास सुरू झाला. वेदनेतून कविता जन्माला आली व त्या पलीकडे जाऊन मी कशी जीवन जगत आहे हे सांगितले. या संग्रहात एकूण 45 कविता आहेत. यात अग्रक्रम मी जमादात्रीला दिला, व आई कशी होती याचे तंतोतंत वर्णन केले. आई इतकेच महत्त्व बापाला असते . तो सतत झिजतो व मुलांचे कल्याणाचे स्वप्न पाहतो हे मांडले .तसेच आई आणि सासू बाईत मी दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू. फरक करू नका सांगितले . एक जन्म देते तर दुसरी जीवन साथी देते . तसेच “अष्टपैलू हिरा माझा” मध्ये दिवंगत डॉ.सूरज यांच्या आठवणींना उजाळा दिला. चंद्रमौळी झोपडी ही महाला पेक्षा कमी नाही हे सांगितले. तसेच वर्षा राणीचे आगमन झाले तर सर्व सृष्टी सजीव होते हे सांगितले तसेच “वटपौर्णिमा “या कवितेत स्त्रियांना सौभाग्य किती प्रिय असते हे सांगितले . “जगावं कसं” यात पिंपळ सारख खडकावर उगवतो पण मूळ जमीन घट्ट पकडून ठेवते व ताठ उभे राहते हे सांगितले. “एकटी नारी “मध्ये विधवेची करूण कहाणी सांगितली .सत्य सांगितले . तसेच “वार्धक्य” कवितेत वृद्ध असलो तरी अनुभव संपन्न आहोत. वृद्धत्व शाप न मानता वरदान माना व ताठ मानेने जगा हे सांगितले. तसेच “श्रृंखला “कवितेत श्रृंखला तोड अन्यायाच्या व मुक्त हो सांगितले. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सांगितले. तसेच ज्ञानज्योती सावित्रीचे सर्वांवर अगणित उपकार आहेत व कशी धूळ पाटीत अक्षरे गिरवत स्वतः आध्य शिक्षिका झाल्या व स्त्रियांना साक्षर केले सांगितले. “नियती”मध्ये कितीही करू दे वारं आणि अन्याय दुःख मला पेलायचे आहे. आज मला नियतीला हरवायचे आहे असे ठासून सांगितले. तसेच संस्कार शिदोरीत उत्तम संस्कार काळाची गरज सांगितले. संस्कारी माणूस आयुष्यात कधीच चुकत नाही हे मांडायचा प्रयत्न केला. महाराष्ट्र माझा, जय जवान, तिरंगात देश प्रेम जागविले.” देवदूत” मध्ये बैल हे देवदूत आहेत व ते कुणब्याचे लेक आहे सांगितले . तसेच “विठ्ठल भेटीची आस” मध्ये पांडुरंगाचे अलौकिक वर्णन केले. ढासळलेली कुटुंब व्यवस्थेत आजकाल कोणाचा पायपोस कोणालाच नाही ,नात्यांची तर किंमत नाही हे सत्य दाखविले. “माहेर “मध्ये जोपर्यंत आईवडील असतात तोपर्यंत स्त्रीला माहेरी स्थान असते. त्यांची पाठ फिरली की घायाळ हरणीगत जीवन असते. हा कवितासंग्रह म्हणजे फक्त शब्दांचे मनोरे नाहीत तर काळजातून आलेले शब्द आहेत. ह्यात अलंकार नाहीत तर भावपूर्ण लयबध्द प्रेम आहे. शब्दफुलांच्या ओंजळीमुळे “वेदनेच्या पलीकडे” जाताना अक्षरांचा प्रसाद लाभला. माणसाने गरजा मर्यादित ठेवल्या तरच जीवन सुंदर बनते. प्राणप्रिय मुलाच्या निधनानंतर नंतर वेदनेच्या पलीकडे जाऊन जीवन जगतांना अनेक साहित्यिक बंधू भगिनींची साथ लाभली त्यामुळे दुःखाला सामोरी जाता आले. “जीवनात एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानवा तुझीया आयुष्याचे”हेच अंतिम सत्य स्वीकारले .आपण सगळे सह्दय माझ्या कविता संग्रहाचे स्वागत कराल याची खात्री बाळगते. लवकरच माझा दुसरा कविता संग्रह येत आहे. जे जे उत्तम ते तुम्हाला समर्पित. बाकीचे ओझे बाळगायला मी समर्थ आहे. धन्यवाद .
सौ .सुनंदा साहेबराव पाटील
नाशिक
“ऋतुगंध “601, माई लेले ,स्कूल मागे ,
सुखात्मे हॉस्पिटल जवळ ,नासिक १३,
जुना गंगापूर रोड ,नासिक .
