
नांदगाव (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावदरा ता.नांदगाव जि.नाशिक या शाळेत मुंबई येथील रहिवासी श्री संदीप कुलकर्णी साहेब यांच्याकडून 51 हजाराच्या शालेय उपयोगी साहित्य भेट देण्यात आले हे साहित्य शाळेला लोकार्पण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुहासजी (आण्णा)कांदे यांच्या सुविद्य पत्नी सौ. अंजुमताई कांदे यांना शाळा व वस्तीमार्फत आमंत्रित करण्यात आले.त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून श्री मधुकर गीते (माजी सभापती नांदगाव) व श्री प्रमोदजी (भाऊ) भाबड (नाशिक मजदूर फेडरेशन संचालक) यांना पाठवले. यांच्या हस्ते साहित्य वाटपाचा सोहळा साजरा करण्यात आला. जि.प.प्राथमिक शाळा गावदरा लोकवर्गणी मध्ये दिवसेंदिवस सरस होत चालली आहे. गावदरा शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री विलास सोनवणे हे आपल्या अनोख्या अध्यापन शैली विषयी संपूर्ण जिल्ह्यात ओळखले जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमी आपल्या शाळेतील राबवले जाणारे विविध उपक्रम समाजापर्यंत पोहोचवीत असतात. त्यांच्या ह्या उपक्रमाला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. समाजातील विविध शिक्षणप्रेमी व्यक्ती त्यांच्या शाळेला वेगवेगळ्या प्रकारे मदत करीत आहेत. जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात टिकून राहता येईल.त्यांच्या या कामाची नोंद श्री संदीप कुलकर्णी साहेबांनी घेतली.

त्यांचा या शाळेशी किंवा शिक्षकांशी कोणताही परिचय नसताना त्यांनी 51 हजाराची मदत पाठवली. त्यात इप्सन कंपनीचा डिजिटल प्रोजेक्टर व लागणारे स्पीकर तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे दप्तर व पाणी बॉटल आणि हा उत्साह साजरा करीत असताना गोड खाऊ अशा एकूण 51000 च्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. काही दिवसापूर्वी प्रीती कानतोडे 301रु.तर लिकेश महुले यांनी 2100 रु.एव्हढी मदत पाठवली होती.इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना ज्या सुख सोयी मिळतात त्या आपल्या गोरगरिबांच्या मुलांनाही मिळाव्यात या सामाजिक जाणवेतून व आपणही समाजाप्रती काही देणे लागतो या वृत्तीचा अनुभव त्यांच्या कृतीतून प्रत्ययास आला. श्री विलास सोनवणे राबवित असलेले आपल्या शाळेचे नव उपक्रम असतील खेळातून शिक्षण असेल किंवा दप्तर मुक्त शनिवार असेल हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात यामध्ये त्यांना श्रीमती हर्षदा शिवदे मॅडम (मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी)यांचे खूप मोठे सहकार्य लाभत आहे हे दोघे मुलांच्या आनंदी शिक्षणासाठी नव उपक्रम शोधून सोशल मीडियावर अपलोड करतात याचाच फायदा पंचक्रोशीत झाला आहे 2023-24 ला पट हा 18 ते 20 होता.आता या शाळेचा पट 35 ते 40 एवढा झाला आहे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे या एक शिक्षकी शाळेत मोठा बदल झालेला पाहून वस्तीवरील पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या साहित्याचे वाटपावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मधुकर गीते यांनी शाळेच्या प्रगतीविषयी गौरव उदगार व्यक्त केले. ह्या कार्यक्रमाप्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोपान शिवदे, सर्जेराव भाबड, विनायक नाईक, नामदेव सांगळे, गौतम सादवे,शांतिभूषण आहिरे, शांताराम शिवदे ऋषीं भाबड,सतीश शिवदे,प्रकाश शिवदे दशरथ शिवदे,सुपडू बाबा, प्रदीप शिवदे, बाबू शिवदे तसेच सर्व ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.ह्या चांगल्या कामामुळे श्री विलास सोनवणे व श्रीम.हर्षदा मॅडम यांचे सर्वत्र कौतुक व शुभेच्छा वर्षाव होत आहे.
