
लासलगाव: ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.२३ जुलै २०२५ रोजी महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री.उज्वल शेलार, राष्ट्रीय सेवा योजनचे कार्यक्रमाधिकारी श्री.सुनिल गायकर, श्री.देवेंद्र भांडे यांच्यासह उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच याप्रसंगी रा.से.यो. स्वयंसेवक पवन जाधव आणि अर्चना आव्हाड या विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्यावर आपली मनोगत व्यक्त केली. तसेच प्रा.रामनाथ कदम यांनी देखील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठीलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. मंडालेच्या तुरुंगात असतानादेखील त्यांनी “गीतारहस्य” ग्रंथ लिहिला. वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले. तसेच त्यांनी स्वदेशीचा नारा सर्वात प्रथम दिला. त्यांनी देशासाठी केलेले कार्य कौतुकास्पद असून अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनीही त्यांचे गुण अंगीकृत करावे. असे प्रतिपादन प्रा.रामनाथ कदम यांनी केले. तसेच प्रा.किशोर गोसावी यांनी देखील लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या स्वातंत्र्य चळवळीमुळेच आज भारत नवनव्या क्षेत्रात क्रांती करत आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जेमतेम 64 वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांच्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांचे हे योगदान पुढील कोणत्याही पिढीला विसरता येणार नाही. असे यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
