
नाशिक:- (प्रतिनिधी ) बालपण ग्रामीण भागात गेल्यामुळे आठवणीतलं गाव जसंच्या तसं काळजात जपलेला आहे. आठवणीत राहिलेल्या गावाकडचा घटनाक्रम नेहमीच प्रेरणा देत असतो, असे प्रतिपादन मनमाड येथील डॉ.रवींद्र सुर्वे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात १६४वे पुष्प ‘मोत्याचं कणीस’ या पुस्तकावर गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विडंबनकार संजय आहेर होते. डॉ.रवींद्र सुर्वे पुढे म्हणाले की, माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होत असतात. पण जुन्या आठवणी तो विसरू शकत नाही. गाव बदलले, माणसांच्या स्वभावात मोठा बदल झाला. गावची जत्रा पूर्वीसारखी राहिली नाही. विविध अनुभव पाठीशी असताना आपण नेहमी शिकत असतो. जे-जे भावले, ते अनुभव आणि आठवणींचा लेखाजोखा पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकात वीस लेख म्हणजे आठवणींचा आणि अनुभवांचा खजिना आहे, असेही ते म्हणाले. अयुब नशीर शेख आणि हेमंत देशमुख या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन आणि आभार मधुकर गिरी यांनी मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२५) नांदगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा.सुरेश नारायणे ‘मनोमनी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
