
छ. संभाजीनगर-प्रसिद्ध आणि ज्येष्ठ स्त्री रोग-प्रसूतिशास्त्र डॉक्टर सविता प्रभाकर पानट यांचे आज मंगळवार 22 जुलै पहाटे दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय 81 होते.गेल्या आठवड्यात त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.डॉ. सविता पानट यांचा शहरातील सामाजिक-शैक्षणिक-साहित्यिक चळवळीशी संबंध होता. त्या प्रागतिक विचारांसाठी ओळखल्या जात. आपल्याला सन्मानाने मृत्यू स्वीकारायचा असून आपल्या पश्चात कोणतेही धार्मिक विधी केले जाऊ नयेत या विषयी त्या आग्रहाने बोलत.शहर आणि राज्य पातळीवरील गायनेकॉलॉजीकल सोसायटीच्या तसेच शहरातील प्रसिद्ध अनंत विद्यामंदिर प्रशालेच्या आणि अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या त्या पदाधिकारी होत्या.साकार’ या अनाथ बाळांचे दत्तक प्रक्रियेद्वारे पुनर्वसन करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य, आणि २५ वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. ‘साकार’ने आतापावेतो कायदेशीररित्या ४०० हून अधिक अनाथ, निराधार बाळांना दत्तक प्रक्रियेद्वारे हक्काचं घर, आई. वडील व मायेचे छत्र मिळवून दिले.छ. संभाजीनगर च्या शासकिय वैद्यकिय महाविद्यलयातून पदवी आणि नागपूर मधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयांतून २० वर्षे अध्यापन केले .छत्रपती संभाजीनगर येथे विभागप्रमुख म्हणून ४ वर्षे तर पुण्याच्या बी. जे वैद्यकिय मध्ये 10 वर्षे त्यांनी काम केले. स्त्रीरोग प्रसूतिशास्त्राचा एकूण ५५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या जवळ होता त्यामुळे बाळांतपणाच्या अनेक अवघड केसेस त्यांच्याकडे येत असत. संपूर्ण महाराष्ट्र्रात त्यांचे असंख्य विदयार्थी आहेत.व्यंधत्व निवारण या विषयातही त्यांनी काम केले आहे.
