
लासलगाव ( प्रतिनिधी ) : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष कला विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय उजळणी कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.भूषण हिरे यांच्या हस्ते झाले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) चे महत्व स्पष्ट करताना, या धोरणामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या नव्या संधी कशा प्राप्त होतील, त्याचप्रमाणे महाविद्यालय परिसरात शिस्त व विद्यार्थी वर्तनाला किती महत्त्व आहे व यातून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास कसा घडून येतो याचे सविस्तर प्रतिपादन केले.भूगोल विभागप्रमुख, व कला व वाणिज्य शाखा उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे यांनी प्रथम वर्ष कला अभ्यासक्रमाचे स्वरूप नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कला शाखा अभ्यासक्रमात होणारे शैक्षणिक बदल, अभ्यासक्रमाची नवीन रचना आणि त्यामागील उद्दिष्टे याची स्पष्ट माहिती स्पष्ट केली. मानसशास्त्र विभागातील प्रा.किशोर अंकुळनेकर यांनी विद्यार्थ्यांना अपार आयडी (ABC ID) निर्मिती कशी करावयची व शैक्षणिक क्रेडिट्स अपार आयडी च्या माध्यमातून आपल्याला यापुढील शैक्षणिक वाटचालीत कसे उपयोगात येणार आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भूगोल विभागातील प्रा.हर्षद कदम यांनी केले, तर मानसशास्त्र विभागातील प्रा.राजेंद्र कडाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.गोविंदराव होळकर व प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ.प्रणव खोचे, प्रा.वाल्मीक आरोटे, प्रा.संदीप शिंदे, प्रा.सर्जेराव दरेकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागांतील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
