
नाशिक:- (प्रतिनिधी ) बालपण ग्रामीण भागातलं असल्याने ग्रामीण जीवनातील अभावग्रस्तता, दैन्य आणि शेतकऱ्याची परवड अनुभवलेली आहे. ग्रामजीवनाच्या जाणिवा मांडत असताना दु:खाशी गाठ बांधल्याने कवितेला आकार आला, असे प्रतिपादन नांदगाव येथील कवी काशीनाथ गवळी यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात काशीनाथ गवळी ‘बाप बळीचिया बळे’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा मारताना ते बोलत होते. भास्कर खैरनार अध्यक्षस्थानी होते. श्री.गवळी पुढे म्हणाले की, शेतात राबताना, दुष्काळाच्या झळा सोसताना बापाची होणारी घालमेल कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. शेतमालाला भाव नसल्याने दसरा-दिवाळी साजरी कशी करावी, अशा बळीराजाच्या हतबलतेचे चित्र कवितांतून मांडले. जेव्हा जगण्यासाठी शेतकरी लाचार होऊन आभाळाकडे पाहतो; तेव्हा डोळ्यातले अश्रूही कोरडे होतात. शेतात राबता-राबता घाम मातीत गाळूनही त्याची झोळी रिकामीच राहते आणि आयुष्याचा जमाखर्च मांडताना ताळमेळ जमत नाही,हे वास्तव माझ्या कवितेचा गाभा आहे, असे सांगून त्यांनी संग्रहातील काही कविताही सादर केल्या. योगाचार्य अशोक पाटील आणि अलका दराडे यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन तर वाळू आहेर यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (२२) मनमाड येथील डॉ.रवींद्र सुर्वे ‘मोत्याचं कणीस’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
