नाशिक:- कविता हा सर्वांना आवडणारा साहित्यप्रकार आहे. मनातील भावना व्यक्त करताना कविता हा प्रभावी दुवा ठरते. म्हणूनच कविता हा मानवी मनातील उत्कट भावनेचा आविष्कार असतो, असे प्रतिपादन मनमाड येथील सुप्रसिद्ध कवयित्री विनया काकडे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' उपक्रमात १६१वे पुष्प 'माझीया मना' या पुस्तकावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे होत्या.
विनया काकडे पुढे म्हणाल्या की, जीवनात अनेक अनुभव घेत निसर्गसौंदर्य, विविध घटनांचा अभ्यास करताना आलेले अनुभव माणसाला वेगळा आयाम प्राप्त करून देतात. अनुभव पाठीशी असल्याशिवाय मार्ग सुखकर होत नाही. स्रीला समाजात आजही मुक्तपणे जगता येत नाही. तिच्या मनाची झालेली घालमेल साद घालते. खंत करत बसण्यापेक्षा भविष्याचा वेध घेण्यातच खरे माणूसपण आहे, असेही त्या म्हणाल्या.
मुक्ता चिंधडे आणि नारायण पाटील यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन तकेले तर अजित कुलकर्णी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१८) नांदगाव येथील प्रसिद्ध साहित्यिक काशीनाथ गवळी 'बाप बळीचिया बळे' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.