
नांदगाव (प्रतिनिधी) एकशे सदतीस वर्षाची उज्वल परंपरा लाभलेल्या येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण तसेच श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.येथील सावता महाराज मंदिर कंपाऊंड मध्ये गुरुवार दि.१७ जुलै २०२५ ते गुरुवार दि. २४ जुलै २०२५ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. हरिनाम सप्ताहात अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण दरम्यान पहाटे ४ ते ६ काकडा भजन, पहाटे पाच वाजता प्रभात फेरी, सकाळी आठ ते बारा गाथा पारायण, व दुपारी २ ते ६ या वेळेत भागवत कथा, सायंकाळी सहा वाजता हरिपाठ तर रात्री ९ ते ११ हरि किर्तन असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षाच्या सप्ताहाचे विशेष अतिथी म्हणून अग्नी आखाड्याच्या पहिल्या महिला महामंडालेश्वर असलेल्या प्रसिद्ध कथावाचक श्री कणकेश्वरी देवी यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथा वाचन होणार आहे. नांदगाव सह पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताहाच्या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती ने केले आहे. कासार खेडा येथील ह.भ.प. नारायण महाराज भडाणेकर, पैठणचे ह.भ.प. गंगाराम महाराज राऊत, चाळीसगाव चे ह.भ.प. विश्वनाथ महाराज वाडेकर, वरुडचे ह.भ.प. भूषण महाराज शिंगरवाडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, आळंदीचे ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे, यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. सप्ताहाच्या सांगता निमित्ताने आळंदी येथील ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांचे सकाळी दहाला काल्याचे किर्तन होईल नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री संत शिरोमणी सावता महाराज उत्सव समिती, नांदगांवने निमंत्रित केले आहे.
