
*लासलगाव दिनांक 11 जुलै ( प्रतिनिधी ) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त “कॉमर्स गुरू गॅलरी” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आदिनाथ मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. डॉ. आदिनाथ मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना “आजीवन शिक्षणाचे महत्त्व” पटवून दिले. त्यांनी सांगितले की ज्ञान हे केवळ पदवीपुरते मर्यादित नसून, ते जीवनभर मिळवायचे असते. सतत शिकण्याची वृत्तीच व्यक्तिमत्त्व विकासास पूरक ठरते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे उपस्थित होते. त्यांनी सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाणिज्य विषयाचे व्यावहारिक महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.मनोहर मोरे यांनी पी.एच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आला. तसेच याप्रसंगी साक्षी डुकरे, साक्षी गांगुर्डे, साक्षी दरेकर, वैष्णवी वीसे आणि गौरव पालवे या विद्यार्थांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरुपौर्णिमेनिमित्त आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता कुलथे हिने केले, तर आभारप्रदर्शन सायली मेमाणे हिने मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.सौरभ तीपायले, प्रा.सुनिल भागवत तसेच महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य विभागाचे डॉ.मनोहर मोरे, प्रा.विरेंद्र आहेर, प्रा.सृष्टी थोरात, प्रा.राधा खांडगौरे आणि प्रा.कावेरी गुंड यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
