
पेठ वडगाव : ( एम. एस. जाधव ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठ वडगाव येथील भूगोल विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंख्या दिनानिमित्त ‘लोकसंख्या आणि शाश्वत पर्यावरण विकास’ या विषयावर के. एम. सी. कॉलेज, कोल्हापूर येथील डॉ. युवराज मोटे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. जागतिक लोकसंख्या दिन दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या समस्या आणि समाजावर त्यांचा प्रभाव याबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा नाश होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी योग्य ती पाऊले उचलणे आवश्यक आहे. पृथ्वीवरील विविध सजीवांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. जैवविविधतेचा ऱ्हास झाला. प्रदूषण वाढले व त्याचा परिणाम मानवी समूहावर झाला. पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर, देश पातळीवर, शासन, विविध संघटना व सामाजिक संस्था पुढे येऊन काम करीत आहेत. शहरीकरण, औद्योगीकरण इत्यादीच्या नावाखाली होणारी पर्यावरणाची हानी आपण रोखली पाहिजे. भविष्यातील शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धन करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. पर्यावरणाचा शाश्वत विकास साधण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यासाठी युवकांतील सकारात्मक ऊर्जेचा वापर होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. युवराज मोटे यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले प्रमुख व्याख्याते डॉ. युवराज मोटे यांचा सत्कार करताना सोबत डावीकडून भूगोल विभाग प्रमुख डॉ. एस. बी. कांबळे,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका प्राध्यापिका एस. एस . अमृतसागर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास चौगले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डिसले म्हणाले की शाश्वत विकास प्रामुख्याने समाज, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संरक्षण या तीन जवळच्या संबंधित आयामामध्ये विभागलेला आहे. मानवाने निसर्गावर अतिक्रमण करून जी आव्हाने निर्माण करून ठेवली आहेत ती पूर्णच हाताबाहेर गेलेली नाहीत. परिस्थितीत सुधारणा होऊ शकते असा आशावाद बाळगून त्यादृष्टीने वाटचाल करणे ही आजच्या युवकांची जबाबदारी आहे. आज मुख्यतः पर्यावरण, ऊर्जा, प्रदूषण इत्यादी विषयाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शासकीय, प्रशासकीय व व्यक्तिगत पातळीवर पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्था संचालिका प्रा. प्रमिलाताई माने व संस्था सल्लागार श्री. शशिकांत कसबेकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. एस. बी. कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवकांत पुपलवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास चौगले यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी व प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
