
लोहोणेर येथील जनता विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचे पाद्यपूजन व गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देताना विद्यार्थी समवेत मुख्याध्यापिका के. ए. शिंदे,पर्यवेक्षक आर.एच.देसले व उपस्थित शिक्षकवृंद.(छाया-सुनिल एखंडे)*
लोहोणेर-: येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात गुरू शिष्याची महती सांगणारी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात व्यासमुनींच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के.ए.शिंदे होत्या तर पर्यवेक्षक आर.एच देसले यांच्यासह शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते.विद्यालयाची विद्यार्थिनी वैदही एखंडे हिने गुरुवंदना सादर केली.त्यानंतर विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या वर्ग प्रतिनिधींनीच्या हस्ते गुरुजनांचे चरण पूजन करत गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागचा हेतू स्पष्ट केला. यावेळी विद्यार्थिनी वैष्णवी भामरे व अक्षदा सुर्यवंशी यांनी गुरुंविषयी महत्त्व व महती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. शेवटी मुख्याध्यापिका के. ए. शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात गुरूंचे आपल्या जीवनात असलेले स्थान व महत्व विशद करत प्रत्येकाने आपल्या जीवनात कोणाला तरी गुरू मानून त्यांचे आचार व विचार जीवनात आत्मसात केले तर आपले ध्येय सहज साध्य करता येईल असे प्रतिपादन केले.सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक वृंदांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समितीच्या वतीने करण्यात आले.
