
सिन्नर( प्रतिनिधी):- डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मविप्र संस्थेचे सिन्नर तालुका संचालक कृष्णाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या प्रागणांत आकर्षक व सुंदर गोल रिंगण केल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
सर्वप्रथम आकर्षक सजावट केलेल्या पालखीत ठेवलेल्या विठुरायाच्या मूर्तीची व ग्रंथांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय समितीचे सदस्य भाऊ रखमा वारुंगसे, मुख्याध्यापक रंगनाथ उगले,पर्यवेक्षक उल्हास पवार आदींच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले.

मुख्याध्यापक उगले यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगून कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले .यावेळी केलेल्या गोल रिंगणात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नाचून फुगडीचा आनंद घेतला.विद्यालयातील जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता. ह.भ.प किरण वाजे ,उमाकांत महाराज ननावरे ,पंकज भालेराव, विशाल ननावरे ऋषिकेश कुंदे यांनी दिंडीत सक्रीय सहभाग घेऊन भजन व अभंग गाऊन रंगत आणली. टाळ- मृदुंगाच्या गजरात संपूर्ण शालेय परिसर दुमदुमला. विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .दिंडीचे आयोजन व सूत्रसंचालन शालेय सांस्कृतिक समितीचे प्रमुख पी.आर.करपे यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत,संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. भास्करराव ढोके,शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठलतात्या वामने यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ गिरी,सुनिल ससाणे,सोमनाथ पगार,डी.ए.रबडे,रेखा खंडीझोड ,शिवाजी गुरुळे,रामदास वारुंगसे,जयश्री गोहाड,कचेश्वर शिंदे,रवि गोजरे,किशोर शिंदे,ज्ञानेश्वर कडभाने आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
