
येवला (दिपक उंडे , प्रतिनिधी) पिंपळखुंटे बु ता.येवला येथील माधुरी उंडे यांनी “अल्झायमर अर्ली प्रेडिक्शन युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)” या विषयावर पीएच.डी. पूर्ण करत गावाचे तसेच नाशिक जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. सध्या त्या मुंबई येथे सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.माधुरी उंडे यांनी आपले संशोधन श्री वैष्णव विद्यापीठ, इंदूर येथून पूर्ण केले आहे. त्यांच्या संशोधनाचा मुख्य उद्देश होता अल्झायमर सारख्या मेंदूच्या आजाराचे लवकरात लवकर निदान करणे. अल्झायमर हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल आजार असून मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत रुग्णाची स्मरणशक्ती कमी होते. हा आजार सामान्यतः उशिरा निदान होतो, ज्यामुळे रुग्णाच्या उपचारात अडचणी निर्माण होतात.माधुरी उंडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अल्झायमरचे प्रारंभिक टप्प्यात निदान करण्यासाठी एक प्रभावी मॉडेल विकसित केले आहे. या संशोधनामुळे अल्झायमरचा धोका असलेल्या रुग्णांची ओळख काही वर्षे आधीच करता येईल. यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळून त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.माधुरी यांचे शैक्षणिक कारकीर्द देखील प्रेरणादायी आहे. त्यांनी तंत्रज्ञानातील आव्हाने स्वीकारत, संशोधनात सातत्य ठेवले आणि अल्झायमर सारख्या गुंतागुंतीच्या विषयावर महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, गावकरी तसेच शिक्षण संस्थेतून अभिनंदन केले जात आहे.त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. माधुरी उंडे यांनी भविष्यात आरोग्य विषयक तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी नवे संशोधन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवीन दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पीएच.डी.यशस्वी कामगिरी मुळे त्यांचे पती श्री.प्रसाद कु-हे, सासरे श्री.शिवाजी कु-हे , आई नंदा उंडे यांनी तिचे कौतुक केले. त्या गावातून पहिल्या महिला आहे की त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पीएच.डी.पदवी त्यांनी प्रदान केली.
