
नाशिक:-(प्रतिनिधी )समाजातील व्यंग कमी शब्दात जास्त आशय मांडणाऱ्या वात्रटिकेत सांगून वाचकांचे मनोरंजन केले जाते. वाचनातून प्रत्येकाच्या जगण्याला दिशा मिळत असते. अशा पुस्तकांनीच आयुष्य अधिक संपन्न होते, असे प्रतिपादन मनमाड येथील सुप्रसिद्ध कवी आणि वात्रटिकाकार प्रदीप गुजराथी यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात ‘व… वात्रटिकेचा!’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तु.सी.ढिकले होते. गुजराथी पुढे म्हणाले की, साहित्यात परिवर्तन करण्याची ताकद असते. ज्याला गीता समजून घ्यायची असेल त्यांनी कृष्ण व्हायला हवे. ज्याला बासरी ऐकायची असेल तर त्याने राधा बनायला पाहिजे. कोणत्याही गोष्टीत विसगंती शोधली तर त्याची टिका होते. त्यातूनच पुढे वात्रटिका होते. समाजातील अनिष्ट रुढीपरंपरांवर प्रहार करण्याची ताकद वात्रटिकेमध्ये असते, असे सांगून त्यांनी पुस्तकातील काही वात्रटिका सादर करून रसिकांना हसवले. एन.एन.कुलकर्णी आणि माणिकराव गोडसे यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन आणि जगदीश देवरे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (८) कवी हेमंत वाले ‘मनातले काही’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
