
साकोरे (प्रतिनिधी), ३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय साकोरे येथे पालक-शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते.या मेळाव्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि सर्वांगीण विकासावर चर्चा करणे हा होता. या शिक्षक पालक सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन आदरणीय रमेश काका बोरसे हे होते. अध्यक्षीय भाषणातून शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांची वाटचाल व शाळेतील समस्यांवर करावे लागणारे उपाय यावर पालकांसोबत चर्चा केली. सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे प्राचार्य झाल्टे डी. एस. यांनी उपस्थित पालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षेसाठी शाळेचे नियोजन कसे असते त्याविषयी खैरनार बी. आर. व गुरुकुल विभागाची माहिती बोरसे एस.बी. यांनी सांगितली.तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या युगाशी सुसंगत असा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI या विषयावर चौरे जे.के. यांनी अभ्यासपूर्ण व उपयुक्त माहिती पालकांना सांगितली. पालकांनीही आपल्या मुलांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या अपेक्षा शिक्षकांसमोर मांडल्या. अनेक पालकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले आणि शिक्षकांच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला.हा मेळावा यशस्वीरीत्या पार पडला आणि यातून पालक व शिक्षकांमधील संवाद अधिक दृढ झाला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. सभेच्या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे सदस्य, सरपंच किरणभाऊ बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश बोरसे, पत्रकार बाबासाहेब बोरसे, पालक व इतर ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या सभेत सूत्रसंचालन माळी यु. एल. यांनी केले व आभार भोई जे.के. यांनी केले.
