
लासलगाव ( प्रतिनिधी ) ता. १ येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि कृषी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक यांच्या हस्ते हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर रा.से.यो. स्वयंसेवक शिवराज शर्मा आणि कल्याणी ठोके या विद्यार्थ्यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त केली, तसेच प्रा.किशोर गोसावी यांनी जयंतीनिमित्त उपस्थितांस शुभेच्छा दिल्या आणि वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आजच्या काळात समाजाने वसंतराव नाईक यांचे विचार आत्मसात करण्याची नितांत गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुनिल गायकर यांनी केले. यावेळी उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि रा.से.यो. स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
