
सिन्नर (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा काजीपुरा सिन्नर येथील जेष्ठ उर्दू शिक्षिका श्रीमती नुरून्निसा अतिक अहेमद या आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या.काजीपुरा सिन्नर येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष श्री.एस.बी. देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी सिन्नर तहसील कार्यालयाचे निवृत्त नायब तहसीलदार महामित्र दत्ता वायचळे,काँग्रेस पक्षाचे सिन्नर शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, हाजी दादाभाई सैय्यद,परवाज एज्युकेशन अँड वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष सलीम काझी,सेक्रेटरी शहेबाज सैय्यद, संचालक साजिद खतीब, जमिर सैय्यद सर, बाबुभाई फिटर, जमीर काझी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.* *कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तरन्नुम मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक श्रीमती शबनम मॅडम यांनी केले.जमिर सैय्यद सर यांनी श्रीमती नुरून्निसा मॅडम यांनी 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत सोप्या आणि आनंददायी शिक्षणातून अनेक मुलांचा शैक्षणिक पाया पक्का केल्याने सर्वच विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे सांगितले. महामित्र दत्ता वायचळे यांनी नुरून्निसा मॅडम यांनी शारीरिक विकलांग असताना आणि प्रतिकूल परिस्थिती असून देखील उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी घडविण्याचा पवित्र व्यवसाय पत्करल्याबद्दल आणि अध्यापनातील उत्कृष्ट शैलीचा अभिमान वाटत असल्याचे सांगून सेवानिवृत्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.* *आपल्या मनोगतातून श्रीमती नुरून्निसा मॅडम यांनी 1989 मध्ये सिन्नर येथील काजीपुरा भागातील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेच रुजू झाल्यावर छोट्या छोट्या वर्गांमध्ये अध्यापन करताना बऱ्याच अडचणी आल्याचे सांगितले.पावसाळ्यामध्ये सर्वच वर्ग खूप गळायचे,पाणी साठायचे आणि त्याही परिस्थितीत अध्यापन केल्याचे सांगितले.मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचं महत्त्व अत्यल्प असल्याकारणाने घरोघरी जाऊन विद्यार्थी गोळा करून शाळेत दाखल करून त्यांना शिक्षण दिल्याचे सांगितले. पालकांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये उदासीनता असल्याचे सांगून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे दिव्य पार पाडत असताना असंख्य अडचणी आल्याचे नमूद केले.शाळेला ईमारत नाही, क्रीडांगण नाही,संगणक नाही,टाॅयलेट नाही,रॅम नाही, ग्रंथालय नाही,प्रयोगशाळा नाही यामुळे वैतागून स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज शिक्षण विभागाकडे दिला परंतु तो मंजूर झाला नसल्याचे सांगितले.आपणास आलेल्या अडचणी आपल्या शाळेतील इतर शिक्षकांना येऊ नये म्हणून समाजातील काही व्यक्तींना याबाबत सांगितले असता सलीम काझी,शहबाज सैय्यद,जमिर सैय्यद सर,मुदीर शेख, इकबाल सैय्यद, इम्रान पठाण,तन्वीर शेख,गौसखान आदी तरुणांनी एकत्र येऊन परवाज एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना करून वर्षभरातच 6 अद्ययावत वर्गखोल्या,किचन शेड,पेवर ब्लॉकयुक्त क्रीडांगण, संगणक,शालेय पोषणआहारा साठी स्वतंत्र खोली,फिल्टर, स्वच्छतागृह,के.जी.च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत गणवेश इत्यादींची व्यवस्था पूर्ण केली. फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम काझी आणि सेक्रेटरी शहेबाज सैय्यद यांनी श्रीमती नुरून्निसा मॅडम यांचा सेवापूर्ती कार्यक्रम नवीन इमारतीतच पार पाडण्याचा चंग बांधून तो पूर्णत्वास नेला. दोघांनीही मॅडमच्या कार्याचा उल्लेख करून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.* *कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.एस.बी.देशमुख सर यांनी सेवेची सुरुवात आणि सेवेचा शेवट एकाच ठिकाणच्या शाळेत झाल्याने श्रीमती नुरून्निसा मॅडम खूप भाग्यवान असल्याचे सांगितले. त्यांनी प्रतिकूल परिस्थिती मधून शिक्षण घेऊन शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना केलेले ज्ञानदानाचे काम खूप उच्च आणि पवित्र असल्याचे सांगितले.मॅडमची झोपडपट्टीतल्या मुलांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी केलेली मेहनत सोबतच सर्व स्टाफला दिलेली अनुभवाची शिदोरी चिरकाल स्मरणात राहणारी असेल असे सांगून मॅडमचे विद्यार्थी उच्चशिक्षित झाले पाहिजे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी परवाज एज्युकेशन अँड वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून के.जी.ते पी.जी. पर्यंतच्या वर्गांची मान्यता आणण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. तसेच सेवानिवृत्तीनंतरचे मॅडमचे आयुष्य सुखाचे,समाधानाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावो या प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.* *कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.आफताब अंजुम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा काजीपुरा येथील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी सहकार्य केले. याप्रसंगी मुस्लिम समाजातील विद्यार्थिनी सानिया इम्रान खतिब हीने बारावी विज्ञान शाखेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तसेच जुल्फिन जमिर सैय्यद हीने एस.एस.सी. परीक्षेमध्ये 95 टक्के मार्क्स मिळवल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.*
