
नाशिक [ वृत्तसेवा ] समाजात जे जे चांगलं घडतं त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. एक मुलगी शिकली तर दोन्ही घराचा उद्धार होतो म्हणून मुलींनी शिकून पुढे आलं पाहिजे. विविध स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन केले पाहिजे, असे प्रतिपादन अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित गिरजा महिला मंचातर्फे दहावी आणि बारावी विद्यार्थिनींच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना मनात असली पाहिजे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही आपली संस्कृती आहे. असेही मत यावेळी सुरेश पवार यांनी व्यक्त केले. विद्यार्थीदशेतच कर्तुत्वाचा सन्मान झाला की, पुढे यश संपादनासाठी ते अधिक प्रेरणादायी असते, असे मत गिरजा महिला मंचच्या जिल्हाध्यक्षा शितल कुयटे यांनी व्यक्त केले. निस्वार्थीपणे तालुक्यातील सर्व मुलींचा गुणगौरव सोहळा आयोजित केल्याबद्दल तसेच या सेवाभावी कार्याबद्दल गिरणा गौरव प्रतिष्ठान तसेच गिरजा महिला मंचाचे आभार मुक्तानंद शाळेचे प्राचार्य अरुण विभुते यांनी व्यक्त केले. ध्येय उंच असेल तर यशाचे शिखर गाठण्यास वेळ लागत नाही. त्यासाठी झपाटून अभ्यास करणे महत्त्वाचे आहे असे मत गिरणा गौरव प्रतिष्ठान संचालक कवी रतन पिंगट यांनी व्यक्त करून स्रीजाणिवेची धुणं कविता उपस्थितांपुढे सादर केली. यावेळी माईंड पॉवर ट्रेनर विलास दिघे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी कापसे उद्योग समूहाच्या संचालिका वंदना कापसे, एंन्झोकेम शाळेचे मुख्याध्यापक दत्तकुमार उटावळे, बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, गिरजा महिला मंच तालुका अध्यक्षा पूनम दुकळे, उपाध्यक्षा संगीता महाजन, सचिव जयश्री राठोड, संचालक योगिता सोनवणे, विजया हिरे, किशोरी नाकोड, रेखा बाविस्कर, कावेरी दांडगे, सविता शिरसाट, रंजना मडके, सोनाली आळंदीकर, शिवाली सांगळे, स्वाती वारुंगुळे, अश्विनी पगारे, प्रियंका ससे,अंजली तांबे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी कापसे उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब कापसे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन रेखा बाविस्कर, सविता शिरसाठ यांनी केले तर आभार संगीता महाजन यांनी मानले.
