
वाखारी (विजय चोपडा). रविवार दिनांक २९/०६/२०२५ रोजी किसान माध्यमिक विद्यालय वाखारी येथे ३३ वर्षांनी सर्व वर्गमित्र आपल्या जीवनसाथीला सोबत घेऊन एकत्र आले होते. त्यांचे सर्व शिक्षक आज सेवानिवृत्त झालेले आहेत. १६ विद्यार्थी आणि ९ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सर्वांनी राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर रांगेत आपल्या वर्गात जाऊन बसले. मांडवडे सरांनी त्यांची हजेरी घेतली. श्रीमती हिरे मॅडम यांचे या बॅच सोबत विशेष ऋणानुबंध होते. मॅडम रुजू झाल्या तेंव्हाची ही बॅच होती. पुन्हा शालेय जीवन अनुभवण्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. सर्वांनी शिक्षकांना आपला परिचय करून दिला. जीवनात झालेली प्रगती सांगितली. आपले नाव, सध्या असलेला व्यवसाय, अपत्यांचे शिक्षण, सध्याचा पत्ता सांगितला. आज आपल्याला सोडून गेलेले शिक्षक आणि वर्गमित्र यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केली. विद्यार्थी तसेच शिक्षकांनी मनोगताततून जुन्या आठवणींना उजाळा दिला. जेंव्हा या वास्तूची पायाभरणी झाली आणि शाळेचा नवीन वास्तूत प्रवेश झाला तेंव्हाची बॅच असल्याने त्यांनी केलेले श्रमदान, झाडांसाठी विहिरीवरून आणलेले पाणी, शिक्षकांनी घेतलेली मेहनत यावर माजी शिक्षक श्रीमती हिरे मॅडम, अनिल पवार सर, मांडवडे सर, पोपट चव्हाण सर भरभरून बोलले. तत्कालीन ग्रामस्थांचे शाळा उभारणीत लाभलेले सहकार्य, शाळा विनाअनुदानित असतांना शिक्षकांना अडी-अडचणीत मिळालेली मदत याबद्दल शिंदे सर यांनी माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातून मिळणारे विद्यार्थ्यांचे प्रेम, आपुलकीची भावना, आदर हे शहरात मिळत नाही असे म्हटले.अगदी कमी वेळेत या स्नेहमेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक खंडू खालकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. सध्या बदलत्या शिक्षण पद्धतीत शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या असलेल्या गरजा, आवश्यक सुधारणा याबाबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी आपसात विचार विनिमय करून शाळा विकासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या प्रगतीबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त केले. आपण लावलेली झाडे आज किती मोठी झालेली आहेत हे फार सुखावणारे असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रसंगी या शाळेतून आपल्या नोकरीला सुरुवात केल्याच्या आठवणी हिरे मॅडम, अनिल पवार सर यांनी सांगितल्या आणि गणपती उत्सवानिमित्त गणपती अथर्वशीर्ष पाठांतर स्पर्धा विद्यालयात आयोजित करावी; या बॅच च्या निवडक विद्यार्थ्यांनी पंच म्हणून काम करावे आणि दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०१ ₹ बक्षीस पवार दाम्पत्याने जाहीर केले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांतर्फे सर्व उपस्थित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. स्नेहभोजन झाले. पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सर्वांनी निरोप घेतला.
