
सिन्नर,(वार्ताहर), महाकवी कालिदास हे भारतीय साहित्यातील मानबिंदू आहेत. त्यांचे साहित्य कालातीत असून आज देखील तितकेच ते लोकप्रिय आहे. विरह भावना ही महत्त्वाची प्रेरणा त्यांच्या साहित्यातून प्रकट होताना दिसते. जगभरातील विद्वान साहित्य रसिकांनी त्यांचे साहित्य डोक्यावर घेऊन मिरवले आहे. कालिदास हे कवी कुळाचे कुलगुरू आहेत. त्यांचा समृद्ध वारसा आजच्या साहित्यिकांनी पुढे चालवायला हवा, असे प्रतिपादन प्रा. राजाराम मुंगसे यांनी सिन्नर वाचनालयात बोलताना केले.

सिन्नर तालुका साहित्य भारती आणि सिन्नर सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यचर्चा या कार्यक्रमात महाकवी कालिदास यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान विषयावर ते बोलत होते. कालिदासाच्या मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय, अभिज्ञान शाकुंतल या नाटकांची ओळख करून देऊन रघुवंश, कुमारसंभव ,ऋतुसंहार व मेघदूत या महाकाव्यांसोबतच विविध साहित्यकृतींची प्रा.मुंगसे यांनी आपल्या रसाळ वाणीने विस्तृत ओळख करून देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मेघदुतातील श्लोकांचा समश्लोकी मराठी काव्यानुवाद सादर करत शापदग्ध यक्षाचा करूणाविलाप सादर करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेंद्र वैद्य, म.सा.पचे कार्याध्यक्ष प्रसिद्ध कवी रवींद्र कांगणे. म.सा.प.चे उपाध्यक्ष किरण भावसार उपस्थित होते. डॉ. श्यामसुंदर झळके यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमासाठी मोहन वाकचौरे, शाहीर स्वप्निल डुंबरे, प्रा. जावेद शेख, मनीषाताई उगले, जयश्री चव्हाणके ,रोहिणी मिठे, सोमनाथ चव्हाणके ,विशाल चव्हाणके,विनय गुजराथी व नव साहित्यिक आदी मान्यवरांसह नवसाहित्यिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली, कवी कालिदासांच्या कलाकृतींना आज २००० वर्षे झाली तरी त्यांचे काव्य अजरामर आहे ही त्यांच्या काव्याची खरी ओळख आहे असे प्रतिपादन किरण भावसार यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शामसुंदर झळके यांनी सिन्नर मधील महाराष्ट्र साहित्य परिषद व साहित्य भारती यांचे साहित्य क्षेत्रातील कार्य अतिशय चांगले असून साहित्य निर्मितीची प्रेरणा या कार्यातूनच मिळते, त्यासाठी सिन्नरमध्ये सातत्याने साहित्यचर्चा व्हायला हवी असे मत मांडले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृक्षमित्र विष्णू वाघ यांनी केले तर आभार कवी उत्तम खताळे यांनी मानले.
