
नासाका माध्यमिक विद्यालयात शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त बोलताना प्रा.सोमनाथ आगळे. समवेत विकास भागवत, मुख्याध्यापक अरुण पगार.
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )सामाजिक समानता आणि आधुनिक दृष्टी येण्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असल्याचे राजर्षी शाहू महाराज यांनी ओळखले. त्यासाठी प्रत्यक्ष पायाभरणी करणारे शाहू महाराज हे सामाजिक भान जपणारे द्रष्टे विचारवंत होते, असे प्रतिपादन पळसे येथील ग्रामाभिमान मंचचे सचिव प्रा.सुनील आगळे यांनी केले.
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन म्हणजेच सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अरुण पगार, महाराष्ट्र माझा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष विकास (बंटी) भागवत, ग्रामाभिमान मंचचे खजिनदार समाधान गायधनी, सदस्य रवींद्र टिळे, राहुल फडोळ, ओमकार गायधनी, सोहम गायधनी मंचावर उपस्थित होते.
प्रा.आगळे पुढे म्हणाले की, कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी विविधांगी कार्य करत सर्वांसमोर आदर्श निर्माण केला. आपल्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाने ‘लोककल्याणकारी राजा’ असे नाव अजरामर करणाऱ्या शाहू महाराजांचे कार्य आजच्या पिढीने आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी केले. विकास भागवत यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांसह महापुरुषांच्या जीवनकार्याची पुस्तकं प्रत्येकाच्या घरी असायला हवी. महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे विचार मांडले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचारी उपस्थित होते. ग्रामाभिमान मंचचे अध्यक्ष प्रमोद गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
