
नाशिक:-(प्रतिनिधी ) रोजच्या जीवनात आपण अनेक नातेसंबंध जोपासत असतो. मानवी जीवनातील ही विविध नात्यांची बंधनेच आपल्याला अधिक संपन्न करत असतात. ह्या रेशीम नात्यांची मनोहारी गुंफण म्हणजे ‘रेशीमझुला’ आहे, असे प्रतिपादन पिंपळगाव बसवंत येथील साहित्यिक प्रा.नामदेव जाधव यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात ते ‘रेशीमझुला’ या पुस्तकावर बोलत होते. योगाचार्य अशोक पाटील अध्यक्षस्थानी होते.
प्रा.जाधव पुढे म्हणाले की, मानवी जीवन नात्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शेतकऱ्याचे जमिनीशी नाते, भक्ताचे विठ्ठलाशी नाते, मुलीचे बापाशी असलेले नाते… अशा विविध नात्यांचा आयाम पूर्ण करण्यासाठी नाती जपावी लागतात. माय, माती आणि निसर्ग या सर्वांशी असलेल्या नात्यातून मानवी भावना जपण्याचा प्रयत्न केला तर मानवी मन परिपूर्ण होते, असे सांगून संग्रहातील विविध कविता सादर केल्या.
ज्येष्ठ साहित्यिक वाळू आहेर आणि सुहास टिपरे या यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सू त्रसंचालन केले तर संजय आहेर यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२७) सुप्रसिद्ध कवी भास्कर देशमाने ‘आंब्यऱ्या-झुंबऱ्या’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
