
नाशिकरोड:(प्रतिनिधी)- इसवी सन पूर्व २२००पासून ते आजपर्यंतच्या वाटचालीत नाशिक सातत्याने प्रगतिपथावर अग्रेसर होत आहे. आपल्या नाशिकचे प्राचीन, ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक असे सर्वांगीण महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन व्यासंगी अभ्यासक देवेंद्रनाथ पंड्या यांनी केले. शिखरेवाडी येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने ‘आपले नाशिक’ या विषयावर देवेंद्रनाथ पंड्या यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात वरील विचार मांडले. ते पुढे म्हणाले की, नाशिकमधील पूरातन मंदिरे, काळाराम मंदिराच्या दर्शन मार्गात असलेल्या नवनाथांच्या दोन समाध्या अशा अनेक वास्तू आजही उभ्या आहेत. नाशिक नगरातील नदीपात्रात अनेक पवित्र तीर्थकुंडे होती, असे सांगून त्यांनी ब्रिटीश काळापासून नाशिक नगरपालिका, नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय, रेल्वेस्थानक याविषयी मौलिक माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात कल्पना वैद्य यांनी प्रमुख वक्त्यांचे विशेष आभार मानले. सचिव अविनाश गोसावी, उपसचिव रवींद्र चंद्रात्रे, श्रीकांत मोहरील, उपखजिनदार शरद वैद्य, परमेश्वर चिंतकिंदी, सुधाकर सोनवणे, प्रदीप भालेराव, विजय गीत, शालिनी डहाळे, मंगल मोहरील, वैदेही कुलकर्णी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. प्रमुख पाहुण्याचा परिचय सुनंदा गोसावी यांनी करून दिला. सचिव अविनाश गोसावी यांनी त्रिवार ॐकार जप आणि गुरुवंदना म्हटली. रवींद्र चंद्रात्रे यांनी निवेदन केले. राम कुलकर्णी यांनी आभार मानले.
