
नाशिक:-(प्रतिनिधी ) आपल्या जीवनाचा खरा सार वाडवडील आणि गुरुजनांच्या शिकवणीत आहे. मानवी कल्याणासाठी मानवी मूल्यं जपली पाहिजेत; तीच संस्कारांची मंजिरी आहे, असे मत कवयित्री सरला मोते यांनी व्यक्त केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित हुतात्मा स्मारकात ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘कृष्णमंजिरी’ या पुस्तकावर त्या बोलत होत्या. माजी आ.नानासाहेब बोरस्ते अध्यक्षस्थानी होते. मोते पुढे म्हणाल्या की, समाजाची घडी सुधारण्यासाठी संस्कारांचे बीज पेरले पाहिजे. पर्यावरण आणि थोरामोठ्यांचा आदर करण्याची परंपरा जोपासली पाहिजे. थोर संतांची शिकवण आत्मसात करायला हवी. असा आशय मांडणाऱ्या कविता या संग्रहात आहेत; असे सांगून मंगळसूत्र, आई, मविप्र माउली, बाप, पर्यावरण, संस्कार अशा विविध कविता सादर केल्या. कवयित्री सुनंदा पाटील आणि मुक्ता चिंधडे या भाग्यवान विजेत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर तुकाराम ढिकले यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (२४) कवी नामदेव जाधव हे ‘रेशीमझुला’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
